बंगळुरू : भारतामध्ये कोरोना व्हायरसचा पहिला बळी गेला आहे. कोरोनामुळे कर्नाटकच्या कलबुर्गीमध्ये एका ७६ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक सरकारच्या आरोग्यमंत्र्यांनी याला दुजोरा दिला आहे. भारतामध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसचे ७४ रुग्ण आढळले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मृत झालेली व्यक्ती २९ फेब्रुवारीला सऊदी अरबच्या जेद्दाहहून परत आली होती. कोरोनाची लक्षण आढळल्यानंतर या व्यक्तीला नातेवाईकांनी १० मार्चला हैदराबादच्या एका रुग्णालयात दाखल केलं. चांगल्या उपचारांसाठी कुटुंब रुग्णाला पुन्हा कलबुर्गीला आणत होतं, पण रस्त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला.
'कलबुर्गीमध्ये एका ७६ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला करोनाची लागण झाली होती. प्रोटोकॉलनुसार आयसोलेशन आणि इतर उपाय वापरले जात आहेत,' असं ट्विट कर्नाटकचे आरोग्यमंत्री बी.बी.श्रीरामुलु यांनी केलं आहे.
महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १४ वर पोहोचली आहे. मुंबईमध्ये कोरोनाचा आणखी एक रुग्ण वाढला आहे, तर ठाण्यामध्येही कोरोनाचा एक रुग्ण सापडला आहे. ठाण्याचा रुग्ण फ्रान्सवरुन आणि मुंबईचा रुग्ण दुबईवरुन परत आला आहे. यातल्या मुंबईचा रुग्ण वृद्ध असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी ९ पुण्याचे, ३ मुंबईचे, १ ठाणे आणि १ नागपूरचा आहे.