भारतात कोरोना लसीची पहिली चाचणी, ३० वर्षांच्या व्यक्तीवर प्रयोग

भारतामध्येही कोरोनाच्या लसीवर पहिला मानवी प्रयोग करण्यात आला आहे.

Updated: Jul 24, 2020, 09:03 PM IST
भारतात कोरोना लसीची पहिली चाचणी, ३० वर्षांच्या व्यक्तीवर प्रयोग

नवी दिल्ली : भारतामध्येही कोरोनाच्या लसीवर पहिला मानवी प्रयोग करण्यात आला आहे. एम्सच्या देखरेखीमध्ये ३० वर्षांच्या तरुणावर लसीची पहिली चाचणी घेण्यात आली. आयसीएमआर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि हैदराबादची कंपनी भारत बायोटेक यांनी संयुक्तपणे या लसीवर संशोधन केलं आहे. हा प्रयोग पहिल्या टप्प्यात आला आहे. 

महाराष्ट्र आयएमएचे अध्यक्ष अविनाश भोंडवे यांच्याकडून झी २४ तासने या लसीबाबत अधिक माहिती जाणून घेतली. मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यामध्ये ३७५ जणांवर या लसीचा प्रयोग केला जाणार आहे. १८ ते ५५ वर्ष वयोगटातल्या व्यक्तींना ही लस दिली जाणार आहे. ३० वर्षांच्या तरुणाला लस दिल्यानंतर त्याला २ तास देखरेखीखाली ठेवण्यात आलं. या काळात त्याच्यावर कोणताही दुष्परिणाम दिसून आला नाही. यानंतर त्या व्यक्तीला घरी सोडण्यात आलं. आता पुढचे ७ दिवस त्याच्यावर पूर्णपणे निगराणी ठेवली जाणार आहे. या व्यक्तीच्या शरिरात ऍण्टीबॉडीज तयार होत आहेत का? तसंच त्याच्यावर कोणते दुष्परिणाम होत आहेत का? हे सगळं पुढच्या ८ दिवसांमध्ये पाहिलं जाणार आहे.

एम्समध्ये १०० तर बाकीच्या १२ ठिकाणी २७५ जणांवर अशी चाचणी करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ही चाचणी यशस्वी झाली, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जास्त जणांवर या लसीचा प्रयोग करण्यात येईल.