नवी दिल्ली : येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी दहशतवादाचा सामना करण्यासाठी पोलिसांकडून एका नव्या तंत्राचा आधार घेण्यात आला आहे. हे तंत्र म्हणजे फेशियल रेकग्निशन कॅमेरा असून, या कॅमेऱ्याद्वारे दहशतवाद्यांवर लक्ष ठेवण्यात मदत होणार आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजधानी नवी दिल्लीमध्ये ३० फेशियल रेकग्निशन कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये असणाऱ्या सॉफ्टवेअरच्या मदतीने दहशतवाद्यांच्या चेहऱ्याचा डेटा फीड केला जाणार आहे.
प्रजासत्ताकदिनी संचलन पाहण्यासाठी येणाऱ्या ३० गेटवर हे ३० कॅमेरे लावण्यात आले आहेत. परेड पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकावर या कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. येणाऱ्या प्रत्येकाचा चेहरा कॅमेराच्या डेटामध्ये फीड केल्या गेलेल्या फोटोशी जवळपास ७० टक्के जुळणार आहे. तसेच कंट्रोल रूममध्ये अलार्म वाजल्यानंतर सुरक्षारक्षकांकडून त्या व्यक्तीला पकडण्यास मदत होईल. कंट्रोल रूममधील मॉनिटरवर स्पेशल सेल, क्राइम ब्रांच तसेच गुप्तचर विभाग लक्ष ठेवणार आहे. दिल्ली पोलीस यंदा पहिल्यांदाच या तंत्राचा वापर करणार आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट रोजी या सॉफ्टवेअरचे ट्रायल घेण्यात आले होते. तसेच दिल्ली विमानतळावरही या कॅमेऱ्याद्वारे परीक्षण करण्यात आले होते. त्यानंतर यंदा पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनी या कॅमेराचा वापर केला जाणार आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी कडक सुरक्षा तैनात केली असून परेड मार्गावर २५० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.