अहमदाबाद : गुजरातमध्ये पावसानं थैमान घातलं असून अनेक जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पूरामुळे विविध जिल्ह्यांमधील एकूण सात हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. उत्तर गुजरातमधील बनासकांठा आणि साबरकांठा तसंच दक्षिण गुजरातमधील वलसाडला पूराचा सर्वाधिक फटका बसलाय.
बनासकांठातील अनेक शहरं आणि गावांना पूराचा वेढा बसलाय. मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असून एनडीआरएफ आणि लष्कराला पाचारण करण्यात आलंय. बनासकांठामधील मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्यानं विविध गावांचा संपर्क तुटलाय.
गुजरातमधील 19 राज्यमार्ग आणि 102 अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत. पुढील सूचना मिळेपर्यंत शाळा कॉलेजस बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिलेत. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी सुरेंद्रनगर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाची हवाईपाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला.