नवी दिल्ली : आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे. सर्वसामान्य जनतेकडून सल्ला घेतल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्रालयाने विभिन्न स्तरावर याविषयावर चर्चा सुरू केली आहे. याचदरम्यान सरकार रेल्वे प्रवाशांसाठी मोफत Wi-Fi सेवा देणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. अशी बातमी रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात याची घोषणा केली जाऊ शकते.
दरम्यान, काही वर्षांपूर्वी देशातल्या काही निवडक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी मोफत Wi-Fi सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या सुत्रांनुसार, सरकार रेल्वे प्रवाशांच्या सुविधांवर गांभिर्यानं विचार करत आहे. त्यामध्ये मोफत Wi-Fi सेवा मुख्य स्थानी आहे.
प्रवासादरम्यान प्रवाशांना इन्टरनेटचा लाभ घेता यावा यासाठी मोफत Wi-Fi सेवा देण्याचा सरकारचा मानस आहे. प्रवास करताना प्रवाशांना कंटाळा येवू नये, हा विचार करत सरकार प्रवाशांच्या मनोरंजनावर विशेष लक्ष केंद्रीत करत असल्याचे रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.
रेल्वे स्थानकावर अनेकदा ट्रेनची किंवा नातेवाईकांची वाट पाहत उभं राहवं लागतं, त्यामुळे यावेळेत प्रवाशांच्या मनोरंजनाचे साधन म्हणून मोफत Wi-Fi सेवा देणार असल्याची शक्यता रेल्वे प्रशासनाने वर्तवली आहे.
सुरवातीला प्रवाशांना १ हजार ६०० रेल्वे स्थानकांवर रेल्वे ऍपच्या माध्यमातून Wi-Fi सेवा देण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. त्यानंतर ऑक्टोबर २०२० पर्यंत ही सेवा इतर ४ हजार ७०० रेल्वे स्थानकांवर देण्यात येणार आहे.