नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा हटवण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गांधी कुटुंबाला आता एसपीजीऐवजी झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे. या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएप कमांडोंकडे असणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. याआधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचीही एसपीजी सुरक्षा हटवून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती.
महत्त्वाच्या व्यक्तींना असलेल्या सुरक्षेबाबत आणि त्यांना असलेल्या धोक्याबाबत ठराविक कालावधीनंतर आढावा घेतला जातो. यावेळीही अशाच प्रकारचा आढावा घेण्या आला आणि गांधी परिवाराला धोका नसल्याचं समोर आलं, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा या ४ व्यक्तींनाच भारतात एसपीजी सुरक्षा देण्यात येते. एसपीजी सुरक्षेमध्ये ३ हजार अधिकारी कार्यरत असतात. १९९१ साली राजीव गांधी यांची हत्या करण्यात आल्यानंतर गांधी कुटुंबाला एसपीजी सुरक्षा देण्यात आली होती. तर १९८५ साली इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबासाठी एसपीजीची स्थापना करण्यात आली होती.