Gautam Adani Net Worth: अमेरिकास्थित सल्लागार संस्था 'हिंडेनबर्ग रिसर्च'चा (Hindenburg Report) अहवाल प्रसिद्द झाल्यानंतर अदानी समूहाला (Adani Group) रोज नवे धक्के बसत असून शेअर्सवर परिमाण होत आहे. हिंडेनबर्गने अदानी समूहावर फसवे व्यवहार तसंच समभागांच्या किंमती फुगवणाऱ्या लबाड्यांसह अनेक आरोप केले आहेत. यानंतर अब्जाधीश गौतम अदानींना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावं लागत असून करोडोंची संपत्ती गमावली आहे. याचा परिणाम जागतिक स्तरावरही होत असून गौतम अदानी श्रीमंतांच्या टॉप -20 यादीतूनही बाहेर पडले आहेत.
Bloomberg Billionaires Index नुसार, गौतम अदानी यांच्या संपत्तीत घट झाल्याने श्रीमंतांच्या यादीत ते 21 व्या स्थानी पोहोचले आहेत. त्यांच्या संपत्तीचा आकडा आता 61.3 अरब डॉलरवर पोहोचला आहे. फक्त गेल्या २४ तासात गौतम अदानींना 10.7 अरब डॉलर्सचं नुकसान झालं आहे. शेअर्समध्ये होणारी घसरण पाहता गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीत फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गच्या मागे पडले आहेत. मार्क झुकरबर्गची एकूण संपत्ती 69.8 अरब डॉलर्स इतकी आहे. श्रीमंतांच्या यादीत तो 13व्या क्रमांकावर आहे.
गौतम अदानी गुरुवारी 64.7 अरब डॉलर्स संपत्तीसह जगातील श्रीमंतांच्या यादीत 16 व्या क्रमांकावर होते. पण फक्त 24 तासांत ते पाच क्रमांकांनी खाली घसरले असून 21 व्या स्थानावर पोहोचले आहेत. गतवर्षी 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणारे उद्योगपती अशी ओळख मिळवणारे गौतम अदानी यांच्यासाठी 2023 हे वर्ष मात्र फारसं चांगलं ठरताना दिसत नाही आहे.
नुकसानाबद्दल बोलायचं गेल्यास, या वर्षाच्या सुरुवातीला गौतम अदानी यांनी 59.2 अरब डॉलर संपत्ती गमावली आहेत. गेल्या 10 दिवसात त्यांना 52 अरब डॉलर्सचं नुकसान झालं आहे.
एकीकडे गौतम अदानी यांच्या संपत्तीत घसरण झाल्याने श्रीमंताच्या यादीत 21 व्या स्थानी घसललेले असताना, दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या संपत्तीतही घट झाली आहे. मुकेश अंबानींच्या संपत्तीत घसरण झाल्याने श्रीमंतांच्या यादीत टॉ-10 मधून बाहेर पडले आहेत.
गेल्या 24 तासात 695 मिलियन डॉलरचं नुकसान झाल्याने मुकेश अंबानी यांची संपत्ती 80.3 अरब डॉलर इतकी झाली आहे. यामुळे ते श्रीमंतांच्या यादीत 12 व्या स्थानी पोहोचले आहेत. दरम्यान, गौतम अदानी यांच्या संपत्तीचा आकडा कमी झाल्याने मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत.