सोन्या-चांदीच्या दरात घसरण; काय आहे आजचा दर

कोरोना व्हायरसचा परिणाम केवळ देशावरच नाही संपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहे.

Updated: Mar 17, 2020, 08:54 PM IST
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; काय आहे आजचा दर title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा परिणाम केवळ देशावरच नाही संपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहे. या संपूर्ण वातावरणात सोन्या-चांदीचे भाव मात्र दिलासादायक ठरत आहेत. कोरोना व्हायरसचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर झालेला दिसतोय. सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम २ हजार रुपयांनी कमी झाला आहे. तर चांदीच्या दरांत ६००० रुपयांची घसरण झाली आहे. 

भारतीय बाजारात सोन्याचा भाव ४१,२४० रुपये प्रति ग्रॅम इतका आहे. तर चांदीचा भाव ३६,६४० रुपयांवर पोहचला आहे. 

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेअर बाजाराच्या घसरणीच्यावेळी गुंतवणूकदारांसाठी सोनं-चांदी हे मौल्यवान धातू समस्यानिवारक ठरले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

भारतीय सराफा बाजारात ९९९ शुद्ध सोन्याचा भाव गेल्या आठवड्यात प्रति १० ग्रॅम ४२,०१७ रुपयांवरून २,०२२ रुपयांनी घसरुन, प्रति १० ग्रॅम ३९,९९५ रुपये झाला. शुक्रवारी चांदीचा दर, ४३,०८५ रुपये प्रति किलोने ६,४४५ रुपये घसरुन ३६,६४० रुपये प्रतिकिलो इतका आला.

दरम्यान, जगभरात शेअर बाजारात घसरण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून गुंतवणुकदार शेअर बाजारात पैसे गुंतवण्याबाबत सावध आहेत. कोरोना व्हायरसमुळे शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे. त्यामुळेच गुंतवणुकदारांनी सध्या या  व्यवहारांपासून दूर राहणं पसंत केलं आहे. अशा परिस्थितीत सोनं हा एकच पर्याय आहे, जिथे गुंतवणुकदार पैसे गुंतवत आहेत.

दरम्यान, कोरोना व्हायरसने  भारतात आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर संपूर्ण भारतात जवळपास १२८ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. सरकारकडून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी आणि उपाययोजना केल्या जात आहेत. सरकारकडून लोकांना घाबरुन न जाण्याचं आणि योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.