मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीचे दर अस्थिर आहेत. त्यामुळे ग्राहकांनी देखील सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर अनेकांनी सोन्याची खरेदी केली, मात्र दिवाळीनंतर आणि ऐन लग्नसराईच्या दिवसांमध्ये सोन्याचे दर वाढण्याची शक्यता बाजार विश्लेषकांनी वर्तवली आहे. दरम्यान सोन्याची मागणी घटल्यामुळे दिल्लीतील सराफा बाजामध्ये सोन्याचे दर ३५७ रुपयांनी कमी होत ५० हजार २५३ रूपये प्रती १० ग्रॉमवर पोहोचले आहेत. तर चांदी ६२ हजार ६९३ रूपये प्रती १० ग्रॉमच्या घरात आहे. चांदीमध्ये ५३२ रूपयांची घट झाली आहे.
मंगळवारी चांदीचे दर ६३ हजार १७१ एवढे होते. तर सोन्याचे भाव ५० हजार ४७५ रूपयांच्या घरात पोहोचले होते. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ कमोडिटी विश्लेषक तपन पटेल म्हणाले, जागतिक दरामध्ये बळकटी असूनही, केंद्रीय बॅंकेच्या हस्तक्षेपामुळे रुपयाच्या मूल्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्यामुळे २४ कॅरेट सोन्याच्या किंमती दिल्लीत ३५७ रुपयांनी घसरल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची किंमत १ हजार ८८२ डॉलर इतकी झाली तर चांदीही प्रति औंस २४.५७ डॉलरवर पोहोचली आहे. न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे भाव ०.२२ टक्क्यांनी घसरून १,८८०.९० डॉलर प्रति औंस झाले.
रुपया मजबूत
गेल्या दोन महिन्यात रुपया मजबूत झाल्याने सोन्याच्या किंमतीत घट दिसून येतेय. रुपया सध्या ७३ ते ७४ रुपये प्रति डॉलर आहे. कोरोना प्रादुर्भावापासून तो ७८ रुपये प्रति डॉलर पोहोचला होता. डॉलरमध्ये तेजी आली तर सोन्याचे दर वेगाने वाढतील. पुढच्या वर्षीपर्यंत सोनं ६० ते ७० हजार प्रति १० ग्रामपर्यंत पोहोचू शकते.