दिपाली जगताप पाटील, मुंबई : जुलै महिना अखेर सुरु झाला की चाहूल लागते गणरायाच्या आगमनाची. यंदा गणेशोत्सव २५ ऑगस्टपासून सुरु होतो आहे. त्यामुळे मूर्ती कारखान्यांमध्ये सध्या जय्यात तयारी सुरु आहे.
गणेशोत्सव सुरु होण्यासाठी अवघा एक महिनाच बाकी आहे. गणेश मूर्ती तयार झाल्या असून त्यावर कोरिव काम सुरु आहे. तर काही मुर्तीचे रंगकामही पूर्ण झालं आहे. पण महत्वाचं म्हणजे जीएसटी देशभरात लागू झाला त्यामुळे गणपती बाप्पाचीही त्यातून सूटका नाही झाली आहे.
गणपतीची मूर्ती आकर्षक बनते ती म्हणजे पीओपी आणि रंगांनी. नेमका या दोन्ही साहित्यांवर जीएसटी लागल्याने गणेश मूर्ती तयार करण्याचा खर्च वाढला असल्याची तक्रार मूर्तीकार करत आहेच. त्यामुळे जीएसटीमुळे मूर्तींच्या किमतीतही १०-१५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
१२ फूट १ लाख रुपयांवरुन १ लाख २० हजार
८-९ फूट ५५ हजार रुपयांवरुन ७५ हजार
६ फूट गेल्यावर्षी ३० हजारावरुन ४० हजार
४-५ फूट २०-२५ हजारावरून ३० हजार
३ फूट १० हजारावरुन १५ हजार रुपये
कारखान्यात अगदी २२ फूटापर्यंत उंच मुर्ती पाहायला मिळत आहे. बाहुबली २ सिनेमा सुपरहिट झाल्याने त्याची क्रेझ गणेशोत्सवातही पहायला मिळणार आहे.
गणेश मूर्ती तयार करण्याच्या ऑर्डर्स जवळपास सात ते आठ महिने आधीपासून घेतल्या जातात पण ऐनवेळी जीएसटी लागू झाल्याने मूर्तीकारांची चांगलीच पंचाईत झाली आहे. त्यामुळे ऑर्डर घेतल्यावर वाढलेल्या किंमती ग्राहकांना सांगायच्या कशा असा प्रश्न मुर्तीकारांना पडला आहे.