नवी दिल्ली : गुरजात विधानसभा निवडणूकीत आता खरा रंग भरला आहे. राज्यातील गल्ली-बोळे ते सोशल मीडियावर सर्वत्र निवडणूकीचीच चर्चा आहे. विशेषत: सोशल मीडियावर काही खास शब्द ट्रेण्ड होत आहेत. यात बाजी मारली आहे ती, 'चहा' आणि 'चाहत' या शब्दांनी.
निवडणूकीचे वारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या डोक्यात इतके गेले आहे की, सोशल मीडिया खास करून ट्विटर हा एक आखाडाच बनला आहे. कॉंग्रेसच्या युवा विंग मासिकाच्या ट्विटर हॅंडलवरून पंतप्रधान मोदींना चहावाला म्हटल्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली. या टिकेला पंतप्रधानांनीही 'मी चहा विकला, देश नाही', असे विधान करून उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी केलेल्या 'मी चहा विकला, देश नाही' या विधानावर पहिली प्रतिक्रिया आली ती, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची. लालूंनी मोदींना उद्देशून ट्विटरवर लिहिले, 'साहेब आपण 'चहा' नव्हे 'चाह' विकली. देशाने आता 'चहा' आणि 'चाह' यातले अंतर ओळखले आहे.' तर, दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसवर निशाणा साधताना अभिनेता आणि भाजपचे खासदार परेश रावल यांनी म्हटले की, 'चहापेक्षा कॉंग्रेसच जास्त उकळत आहे.' दोन्ही प्रमुख नेत्यांन केलेल्या ट्विटनंतर ट्विटरवर समर्थक आणि विरोधकांच्या प्रतिक्रियांचा एकच खच पडला.