वेळेवर घराचा ताबा नाही, बिल्डरला दीड लाखांचा दंड

ग्राहकाकडून पैसे घेतल्यानंतरही वेळेत घराचा ताबा न देणाऱ्या रिअल इस्टेट कंपनीला तब्बल दीड लाख रुपये ग्राहकाला नुकसान भरपाई म्हणून द्यावे लागणार आहेत. 

Updated: Nov 28, 2017, 04:56 PM IST
वेळेवर घराचा ताबा नाही, बिल्डरला दीड लाखांचा दंड title=

चंदीगड : ग्राहकाकडून पैसे घेतल्यानंतरही वेळेत घराचा ताबा न देणाऱ्या रिअल इस्टेट कंपनीला तब्बल दीड लाख रुपये ग्राहकाला नुकसान भरपाई म्हणून द्यावे लागणार आहेत. 

केलेल्या करारानुसार, वेळेवर घराचा ताबा न मिळाल्याची तक्रार राज्य ग्राहक तक्रार निवारण समितीकडे गेली होती. यानंतर समितीनं 'सुष्मा बिल्डटेक लिमिटेड' या रिअल इस्टेट कंपनीला दोषी ठरवत दीड लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. 

सेक्टर-३६ च्या प्रद्मन शोरी यांनी कंपनीत जीरकपूर स्थित प्रोजेक्टमध्ये एक रेसिडेन्शिअल अपार्टमेंट बुक केलं होतं. शोरी यांनी यासाठी ५ लाख ५० हजार रुपयांचं बुकिंग अमाऊंटही भरली होती. अपार्टमेंटची किंमत ४३ लाख ४२ हजार ८५६ रुपये होती.

शोरी यांनी ९० टक्के रक्कमही जमा केली होती. यासाठी त्यांनी बँकेकडून २८ लाख रुपयांचं कर्जही घेतलं होतं. करारानुसार, कंपनीला ४२ महिन्यांच्या आत घराचा ताबा ग्राहकाला देणं बंधनकारक होतं. ३० जुलै २०१५ रोजी ४२ महिन्यांचा कालावधी उलटला तरीही कंपनीनं घराचा ताबा ग्राहकाला दिला नव्हता. 

शोरी यांनी कंपनीला वारंवार ई-मेल द्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना घराचा ताबा काही मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी ग्राहक तक्रार निवारण समितीशी संपर्क साधला. 

समितीनं ग्राहकाची तक्रार योग्य असल्याचा निर्वाळा देत कंपनीला तीन महिन्यांत घराचा ताबा देण्याचे निर्देश दिलेत. सोबतच ग्राहकाला नुकसान भरपाई म्हणून दीड लाख रुपये आणि तक्रारीचा खर्च म्हणून ३५ हजार रुपयांचा दंडही ठोठावलाय.