IAS अधिकाऱ्याला 'पब्लिसिटी स्टंट' करणं पडले महागात; निवडणूक आयोगाने केली कारवाई

IAS Abhishek Singh : 30 लाखांहून अधिक फॉलोअर्स असणाऱ्या अधिकाऱ्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करत परत बोलवले आहे

Updated: Nov 19, 2022, 04:59 PM IST
IAS अधिकाऱ्याला 'पब्लिसिटी स्टंट' करणं पडले महागात; निवडणूक आयोगाने केली कारवाई title=

IAS Abhishek Singh : सोशल मीडिवार (Social Media) प्रसिद्धीसाठी लोक काय करतीय याचा नेम कुणालाच नसतो. बॉलिवुड सेलिब्रिटींपासून ते गल्लीतल्या इन्स्टाग्राम (Instgram) स्टारपर्यंत अनेक जण 'फेमस' होण्यासाठी काही तर वेगळं आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. यामध्ये आता सरकारी कर्मचारी किंवा अधिकारीही मागे नाहीत. पण आता सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणे एका आयएएस (IAS) अधिकाऱ्याला महागात पडलयं. गुजरात निवडणुकीसाठी (gujarat election 2022) कर्तव्यावर असलेल्या या बड्या अधिकाऱ्याला परत बोलवण्यात आले आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या या अधिकाऱ्याने असे काही फोटो आपल्या अकाऊंटवर टाकले की त्यांना निवडणूक आयोगाने (election commission) तात्काळ पदावरून हटवले. आयोगाने असे फोटो शेअर करणे म्हणजे हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले आहे.

गुजरात निवडणुकीत कर्तव्यावर असताना स्टाईलमध्ये फोटो पोस्ट करणे आयएएस अधिकारी अभिषेक सिंह (abhishek singh) यांना महागात पडले आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार रिपोर्ट्सनुसार, निवडणूक आयोगाने आयएएस (IAS) अभिषेक सिंह यांना जनरल ऑब्झर्व्हर पदावरून हटवले आहे. गुजरातच्या बापूनगर आणि असर्वा विधानसभा मतदारसंघाचे जनरल ऑब्झर्व्हर पद स्वीकारल्यानंतर सिंह यांनी इंस्टाग्राम आणि ट्विटरवर काही फोटो पोस्ट केले होते, ज्यामध्ये ते कारसोबत पोज देताना दिसत आहेत. यासोबतच त्यांच्या कारच्या नंबर प्लेटवर लाल रंगात ऑब्झर्व्हर असे लिहिलेले होते.

आणखी एका फोटोमध्ये सिंह त्यांच्या बॉडीगार्ड आणि इतर अधिकाऱ्यांसोबत पोज देताना दिसत आहे. हा पब्लिसिटी स्टंट मानून निवडणूक आयोगाने त्यांना तात्काळ पदावरून हटवले आणि त्यांना मतदारसंघ सोडून नोडल ऑफिसरला अहवाल देण्यास सांगितले. अभिषेक सिंह यांनी आपल्या अधिकृत पदाचा वापर प्रसिद्धी स्टंटसाठी केल्याचे आयोगाने म्हटले आहे.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने तात्काळ अभिषेक सिंग यांना निरीक्षकाच्या जबाबदारीतून मुक्त केले आणि पुढील आदेशापर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारची  जबाबदारी किंवा कर्तव्यावर न ठेवण्याचा आदेश जारी केला.

इंस्टाग्रामवर 30 लाखांपेक्षा  जास्त फॉलोअर्स

आयएएस अधिकारी अभिषेक सिंग सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्याचे इंस्टाग्रामवर 30 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. अभिषेक सिंग यांच्या पत्नीचे नाव दुर्गा शक्ती नागपाल आहे. त्यादेखील प्रसिद्ध सनदी अधिकारी आहेत.