गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

Updated: Jan 29, 2019, 06:54 PM IST
गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांचा राष्ट्रवादीत प्रवेश title=

अहमदाबाद : गुजरातमधील वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. याआधीच शंकर सिंह वाघेला यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची साथ सोडली होती. त्यांनी जनविकल्प नावाच्या पक्षाची स्थापना केली होती. वाघेला यांनी विधानसभा निवडणुकीत 125 उमेदवार मैदानात उतरवले होते. पण सगळ्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. 

आरएसएस आणि जनसंघाच्य़ा माध्यमातून सार्वजनिक आणि राजकारणात प्रवेश करणाऱ्या वाघेला यांनी मागील 2 दशक काँग्रेसमध्ये राहत केंद्रीय मंत्री आणि प्रदेश अध्यक्षपदासह विरोधी पक्ष नेता म्हणून देखील पद भूषवलं होतं. पण मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार न बनवल्याने नाराज वाघेला यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला रामराम केला होता.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांचा जन्म 21 जुलै 1940 ला झाला होता. 2004 ते 2009 दरम्यान ते लोकसभेत केंद्रीय मंत्री (टेक्सटाइल) होते. गुजरातच्या कापडवंज मतदारसंघातून ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महत्त्वाचे नेते होते. बघेला 1996 ते 1997 पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री देखील होते.

काँग्रेस नेता बघेला यांचा जन्म गांधीनगरमधील वसनमध्ये झाला. 1977 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. 1977 ते 1980 पर्यंत ते जनता पक्षाचे गुजरातमधील उपाध्यक्ष होते. 1980 ते 1991 पर्यंत ते भाजपचे जनरल सेक्रेटरी आणि गुजरात प्रदेशचे अध्यक्ष होते. 1984 ते 1989 पर्यंत ते राज्यसभेत होते. 1989 मध्ये लोकसभेसाठी त्यांची निवड झाली.