ईशान्य भारतातल्या निकालानंतर हार्दिक पटेलचा राहुल गांधींवर निशाणा

ईशान्य भारतात झालेल्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपनं घवघवीत यश मिळवलं आहे.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Mar 3, 2018, 07:19 PM IST
ईशान्य भारतातल्या निकालानंतर हार्दिक पटेलचा राहुल गांधींवर निशाणा

मुंबई : ईशान्य भारतात झालेल्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपनं घवघवीत यश मिळवलं आहे. त्रिपुरामध्ये भाजपला बहुमत मिळालं आहे. या राज्यामध्ये २५ वर्ष असलेली डाव्यांची सत्ता भाजपनं उलथवून लावली आहे. तर नागालँडमध्येही भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. ६० मतदारसंघाच्या या राज्यामध्ये भाजपला २९ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे नागालँडमध्येही भाजपचाच मुख्यमंत्री होईल हे निश्चित मानलं जात आहे.

मेघालयमध्ये मात्र काँग्रेस हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष बनला आहे. ५९ मतदारसंघाच्या या राज्यामध्ये काँग्रेसला २१ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला २ जागांवर यश मिळालं आहे.

हार्दिक पटेलचा राहुल गांधींवर निशाणा

या निवडणूक निकालानंतर हार्दिक पटेलनं राहुल गांधी आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. जोपर्यंत विरोधी पक्ष मजबूत होत नाही आणि देशासाठी महत्त्वाचे आणि योग्य मुद्दे उचलत नाही तोपर्यंत सत्तेत असलेले लोकं मनमानी करतील आणि सत्तेचा दुरुपयोग करून निवडणूक जिंकतील. जनमानसामध्ये आम्ही कसे योग्य आहोत हे सिद्ध करतील. एक नेतृत्व एक पक्ष आणि एक ध्येय घेऊन विरोधी पक्षाला पुढे जावं लागेल, असं ट्विट हार्दिक पटेलनं केलं आहे.

हार्दिकची भाजपवरही टीका

देशाचा महत्त्वाचा मुद्दा कोणत्याही पक्षाला भारतातून मुक्त करणं नाही. रोटी, कपडा, मकान, तरुणांना रोजगार, शेतकऱ्यांना अधिकार, चीन आणि पाकिस्तान हे देशासाठी महत्त्वाचे मुद्दे आहेत. निवडणुकीच्या जुमल्यातून सत्ता मिळवणं हा मुद्दा नाही. सत्तेसाठी लढणारा व्यक्ती कोणाचाच नसतो हे लक्षात ठेवा, असं म्हणत हार्दिकनं भाजपवरही टीका केली.