VIDEO: बॅडमिंटन खेळतानाच व्यापाऱ्याला आला हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात जाऊन झोपला अन्...

Viral Video : दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील नोएडा येथे बॅडमिंटन खेळणाऱ्या एका खेळाडूला हृदयविकाराचा झटका आला आणि तो बेशुद्ध पडला होता. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतरही त्या व्यक्तीला वाचवता येऊ शकले नाही.

आकाश नेटके | Updated: Jun 11, 2023, 03:44 PM IST
VIDEO: बॅडमिंटन खेळतानाच व्यापाऱ्याला आला हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात जाऊन झोपला अन्... title=
(फोटो सौजन्य - freepik.com)

Viral Video : सध्या हृदयविकाराच्या (Heart Attack) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कधी नाचताना तर कधी व्यायाम करताना लोकांना हृदयविकाराचा झटका आल्याचे अनेकदा पाहायला मिळालं आहे. असाच काहीसा प्रकार दिल्लीला लागून असलेल्या नोएडात घडलाय. शनिवारी नोएडा स्टेडियममध्ये ( Noida Stadium) बॅडमिंटन खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. बॅडमिंटन खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने ही व्यक्ती बेशुद्ध होऊन पडली होती. त्यानंतर तिथे असलेल्या डॉक्टरांनी खेळाडूला सीपीआर (CPR) दिला. त्यानंतर त्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही.

नोएडाच्या सेक्टर-26 येथील व्यापारी महेंद्र शर्मा हे सकाळी सातच्या सुमारास बॅडमिंटनच्या सरावासाठी आले होते. सुमारे अर्धा तास खेळल्यानंतर त्यांना अशक्तपणा जाणवायला लागला म्हणून ते खाली बसले. मात्र त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचायच्या आतच ते  बेशुद्ध होऊन कोसळले. त्यानंतर तिथेच खेळणाऱ्या डॉक्टर संदीप कंवर यांनी शर्मा यांना सीपीआर दिला. 10 मिनिटे प्राथमिक उपचार करूनही शरीरात कोणतीही हालचाल दिसून आली नाही. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागणार होतं. मात्र महेंद्र शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे.

सेक्टर-55 च्या ए-ब्लॉकमध्ये राहणारे उद्योजक महेंद्र शर्मा हे सुमारे सात-आठ वर्षांपासून बॅडमिंटन खेळत होते. रोजच्या रोज ते सकाळी 7 ते 8 या वेळेत बॅडमिंटन खेळण्यासाठी स्टेडियमवर पोहोचत असत. मात्र शनिवारी खेळत असतानाच त्याच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे ते बॅडमिंट कोर्टाबाहेर बसले. विश्रांती मिळावी म्हणून तिथे खेळणाऱ्या इतर लोकांनी त्यांना पाणी देखील दिले. तिथेच खेळणाऱ्या डॉ.संदीप कवर यांनी तातडीने मेट्रो हॉस्पिटलमधून अॅम्ब्युलन्स बोलावून प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर तब्बल चार तास जीवन-मरणाची झुंज देत अखेर त्यांनी हे जग सोडले.

यापूर्वी मार्च महिन्यातही असेच एक प्रकरण समोर आले होते. हैदराबाद येथे बॅडमिंटन खेळणाऱ्या व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला होता. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर 38 वर्षीय श्याम यादव बॅडमिंटन कोर्टवर पडले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, श्याम यादव ऑफिसमधून परतल्यानंतर दररोज बॅडमिंटन खेळायला जायचे.

दरम्यान, खेळाडू असो वा सामान्य व्यक्ती, छातीत दुखणे, थकवा येणे, चालताना दम लागणे आदी लक्षणे दिसल्यास लवकरात लवकर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे डॉक्टर सांगतात. डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर, त्यांच्या सूचनेनुसार काम केले पाहिजे, अन्यथा त्रास वाढू शकतो. तसेच जेव्हा अशी लक्षणे दिसतात तेव्हा क्रीडा प्रकार किंवा व्यायाम टाळावा