'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणांचे पाकिस्तानमधील माध्यमांकडूनही वार्तांकन

'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणांसंदर्भातील वृत्त 'झी न्यूज'ने दाखवल्यानंतर लगेचच तेथील काही वृत्तवाहिन्यांनी हे वृत्त प्रसारित केले.

Updated: Dec 7, 2018, 04:47 PM IST
'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणांचे पाकिस्तानमधील माध्यमांकडूनही वार्तांकन

नवी दिल्ली - अलवारमध्ये काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्या जाहीर सभेत काही जणांनी 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्यामुळे पाकिस्तानातील भारतविरोधी माध्यमांना नवे खाद्यच मिळाले. 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणांसंदर्भातील वृत्त 'झी न्यूज'ने दाखवल्यानंतर लगेचच तेथील काही वृत्तवाहिन्यांनी हे वृत्त प्रसारित केले.

भारतातील सर्वसामान्य नागरिकांना पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत. पण भारतातील सरकार आणि काही माध्यमांना पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध नको आहेत, असाही आरोप पाकिस्तानातील वृत्त वाहिन्यांनी संबंधित वृत्त प्रसारित करताना केले. पाकिस्तानातील वृत्तवाहिन्यांचे अँकर आणि काही पत्रकारांनी ही विधाने केली आहेत. 

राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलवारमध्ये काही जणांनी 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्याचे समोर आल्यानंतर 'झी न्यूज'ने याआधीच काँग्रेस पक्ष आणि नवज्योतसिंग सिद्धू यांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले होते. नवज्योतसिंग सिद्धू यांच्या जाहीर सभेतच ही घटना घडली होती. 'झी न्यूज'ने हे वृत्त प्रसारित केल्यानंतर सिद्धू आणि काँग्रेस पक्षाने संबंधित व्हिडिओ दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले होते. . काँग्रेसच्या काही नेत्यांकडून तर संबंधित व्हिडिओतील घोषणा देतानाची दृश्ये काढून टाकण्यात आली आणि चुकीच्या पद्धतीने एडिटिंग केलेले व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आले.

दरम्यान, 'झी न्यूज'ने संबंधित वृत्त प्रसारित केल्यानंतर अलवारमधील काही प्रत्यक्षदर्शी आणि सिद्धू यांच्या जाहीर सभेला उपस्थित असलेल्या पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एका पत्रकाराने थेट 'झी न्यूज'च्या कॅमेऱ्यापुढे घडलेली घटना तंतोतंत खरी असल्याचे सांगितले. सिद्धू जाहीर सभेमध्ये बोलत असताना काही जणांनी 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या होत्या, असे त्याने सांगितले.

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी त्यावेळी 'सत श्री अकाल' अशा घोषणा दिल्या होत्या, असे सांगितले. तर खुद्द नवज्योतसिंग सिद्धू यांनी 'झी न्यूज' विरोधात बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता.