नवी दिल्ली : अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्यासाठी टपून बसलेल्या दहशतवाद्यांना कालच्या हल्ल्याच्या निमित्तानं आयतं सावज मिळाल्याचं समोर येतं आहे. गुजरातमध्ये नोंदणी करण्यात आलेल्या यात्रेकरूंच्या ज्या बसवर हा हल्ला झाला त्यांनी सुरक्षेचे सगळे नियम धाब्यावर बसवले होते.
श्रीनगरहून कत-याला येताना संध्याकाळी ७ नंतर प्रवासी महामार्गावर वाहतूकीला मनाई आहे. संध्याकाळी सात नंतर महामार्गावरील सुरक्षा शिथील करून अन्यत्र वळवण्यात येते. त्याचप्रमाणे या यात्रेकरूंनी खरंतरं दोन दिवस आधीच अमरनाथचं दर्शन घेऊन परत फिरणं अपेक्षित होते. मात्र तसं न करता भाविक श्रीनगरमध्ये राहिले. त्यामुळे नियमित बसेसना मिळणारी सुरक्षा या बसला मिळाली नाही आणि दहशतवाद्यांनी डाव साधला.
अमरनाथ यात्रेच्या भाविकांवर अनंतनाग इथं झालेल्या दहशदवादी हल्ल्यात पालघर जिल्ह्यामधील दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे. डहाणूच्या उषा मोहनलाल सोनकर वय वर्ष 48 आणि निर्मला भरत ठाकूर वय वर्ष 45 अशी मृत्यूमूखी पडलेल्या महिला भाविकांची नावे आहेत. हल्ल्यात सात मृत भाविकांपैकी 5 भाविक बलसाडचे आहेत. या बातमीनं बलसाडमध्ये शोककळा पसरली आहे. कालच्या या हल्ल्यात 19 जण जखमी झाले आहेत.