हैदराबाद एन्काऊंटरनंतर नागरिकांचा जल्लोष, पोलिसांवर फुलांचा वर्षाव

हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या चारही आरोपींचं एन्काऊंटर करण्यात आलं आहे.

Updated: Dec 6, 2019, 11:30 AM IST
हैदराबाद एन्काऊंटरनंतर नागरिकांचा जल्लोष, पोलिसांवर फुलांचा वर्षाव

हैदराबाद : हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या चारही आरोपींचं एन्काऊंटर करण्यात आलं आहे. यानंतर हैदराबादमधल्या नागरिकांमध्ये जल्लोषांचं वातावरण आहे. ज्या ठिकाणी एन्काऊंटर झालं त्याठिकाणी शेकडो लोकांनी पोलिसांचं अभिनंदन करत त्यांचं कौतुक केलं. घटनास्थळीच नागरिकांनी घोषणा देत जल्लोष केला. तर गावांगावांमध्ये मिठाई वाटून आतषबाजी केली. हैदराबादमध्ये काही महिलांनी पोलिसांना राखी बांधली. तर नागरिकांनी पोलिसांवर फुलांचा वर्षावही केला.

हैदराबादमधील सामूहिक बलात्कार आणि हत्येतील चारही आरोपींचं एन्काऊंटर करण्यात आलं. घटनास्थळी नेत असताना पोलीस आणि आरोपींमध्ये चकमक झाली. या चकमकीत चार आरोपींना गोळ्या घालून ठार करण्यात आलं. घटनास्थळी गेल्यानंतर या चारही आरोपींनी पळून जाण्यासाठी प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी पोलिसांकडची शस्त्र घेऊन त्यांच्यावर हल्लाही केला. त्यामुळे पोलीस आणि आरोपींमध्ये झालेल्या चकमक झाली. या चकमकीत चारही आरोपी ठार झाले.

हैदराबादमध्ये २७ नोव्हेंबरला ४ आरोपींनी पहिले पीडित महिलेची गाडी पंक्चर केली आणि  मदत करण्याचं नाटक केलं. यानंतर चारही आरोपी तिला टोल प्लाझाजवळच्या निर्जन स्थळी घेऊन गेले. याठिकाणी महिलेवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली.

डॉक्टर महिलेवर अत्याचार केल्यानंतर पेट्रोल पंपावरून पेट्रोल विकत घेऊन तिला हैदराबाद-बंगळुरू नॅशनल हायवेवर तिला जाळण्यात आलं. चारही आरोपींना २९ नोव्हेंबरला अटक करण्यात आली. या प्रकरणावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत होत्या. आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देशभरातून करण्यात येत होती.