पूजा खेडकर चर्चेत असतानाच नवा IAS अधिकारी वादात; सायकल चालवतो, घोडेस्वारी करतो पण दिव्यांग म्हणून ठरला पात्र

पूजा खेडकर यांच्यानंतर अजून एका IAS अधिकारीचा प्रताप समोर आला आहे. नागरी सेवा परीक्षेत आरक्षणासाठी खोटं दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप या अधिकाऱ्यावर होतो आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jul 18, 2024, 03:51 PM IST
पूजा खेडकर चर्चेत असतानाच नवा IAS अधिकारी वादात; सायकल चालवतो, घोडेस्वारी करतो पण दिव्यांग म्हणून ठरला पात्र title=
IAS Praful Desai in controversy while Pooja Khedkar is in discussion Rides a bicycle rides a horse but is qualified as a disabled person

IAS Praful Desai : देशभरात पुण्यातील प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रकरण गाजत आहे. युपीएससी परीक्षा पास होण्यासाठी अनेकांनी विविध गैरप्रकार केल्याचे आरोप होताना दिसत आहेत. पूजा खेडकर यांच्यामुळे युपीएससीत दिव्यांग प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत असतानाच नवा IAS अधिकारी वादात सापडला आहे. तेलंगणाचे आयएएस अधिकारी प्रफुल्ल देसाई यांच्यावर केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षेत आरक्षण मिळविण्यासाठी अपंगत्व प्रमाणपत्र बनावट वापरल्याचा आरोप होतोय. 

प्रफुल्ल देसाई यांचे सायकलस्वारी, घोडेस्वारीसह साहसी खेळ खेळतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर त्यांच्यावर आरोपांनी जोर धरलाय. प्रफुल्ल देसाई सध्या करीमनगरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत आहेत. 

देसाई यांच्यावर UPSC परीक्षेसाठी OH (ऑर्थोपेडिकली दिव्यांग) कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात येतो आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टुडे या संकेतस्थळाने देण्यात आलंय. प्रफुल्ल देसाई यांच्यावर होत असलेल्या आरोपानंतर एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एका युजरने त्यांना आवाहन करत त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण मागितलंय.

या युजरने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, 'तुम्ही प्रफुल्ल देसाई, 2019 च्या बॅचमधील AIR 532 रँकसह EWS आणि ऑर्थोपेडिकली दिव्यांग श्रेणीतील IAS अधिकारी आहात. Twitter वर लोक तुमचे सायकलिंग, टेनिस खेळताना, राफ्टिंग आणि घोडेस्वारीचे फोटो शेअर करत आहेत. आता हे फोटो सार्वजनिक असताना, तुम्ही अचानक तुमचं एक्स अकाउंट प्रायव्हेट केलंय. तुम्हाला कशाची भीती आहे?'

या युजरने पुढे आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'कृपया UPSC ची पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी इच्छुकांच्या शंकांचे निरसन करा. अनेक मेहनती विद्यार्थी समर्पण आणि कठोर परिश्रमातून आपली स्वप्ने जिवंत ठेवतात. कृपया त्यांना उत्तर द्या सर!'

देसाई यांनी आरोपांचे खंडन केलं!

देसाई यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचं खंडन केलंय. ते म्हणाले की, 'त्यांचा एक पाय अपंग आहे, मात्र याचा अर्थ असा नाही की तो शारीरिक हालचालींमध्ये अजिबात सहभागी होऊ शकत नाही. यातील अनेक उपक्रम त्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा भाग असल्याचं त्यांनी सांगितलंय. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, देसाई यांच्या वैद्यकीय अहवालात असं दिसून आलंय की पोलिओमुळे त्यांना चालण्यास त्रास होत आहे आणि त्यांच्या डाव्या पायात 45 टक्के अपंगत्व आहे. देसाई यांनी सांगितलंय की, त्यांच्या एका पायाला पोलिओ आहे, त्यामुळे ते धावू शकत नाही, पण त्यांना चालता आणि सायकल चालवता येते.

देसाई म्हणाले की, 'मी नेहमीचा बॅडमिंटनपटू नाही, पण काही वेळा मी माझ्या बॅचमेट्ससोबत तिथे गेलो आहे. माझ्या अपंगत्वाचा अर्थ असा नाही की मी अजिबात चालू शकत नाही आणि मी मित्रांसोबत थोडे खेळण्याचा प्रयत्न करतो. डिसेंबर 2020 मध्ये डोंगरात 25 किलोमीटर सायकलिंग आणि ट्रेकिंग करतानाच्या व्हायरल झालेल्या फोटोवर देसाई म्हणाले की, या अपंगत्वामुळे मी एका पायाने पेडल करू शकतो आणि दुसऱ्या पायाचा आधार घेऊ शकतो. त्या दिवशी आम्ही मसुरी ते केम्पटी फॉल्स असा प्रवास सायकलने केला, पण मी संपूर्ण प्रवास सायकलने केला नाही.'

देसाई पुढे म्हणाले की, 'मी माझ्या मित्रांसोबत पायी चाललो. डोंगरात ट्रेकिंग हा आमच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा एक भाग होता आणि त्यानंतरच्या ट्रेकिंगच्या मार्गात खडी असल्याने सायकल चालवण्याची गरज भासली नाही. राफ्टिंग करतानाचा जो फोटो शेअर केला जात आहे तो देखील आमच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा एक भाग आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये घोडेस्वारीच्या फोटोबद्दल, IAS अधिकाऱ्याने सांगितलं की हा सराव त्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा एक भाग होता.' शिवाय त्यांनी अकाऊंट खाजगी केल्याबद्दलही सांगितलं. ते म्हणाले की, 'लोकांनी त्यांना तसं करायला भाग पाडलं. कारण त्यांचे फोटो वापरून इतर अकाऊंटवर ते वापरण्यात येत होते.'