लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला तर काय कराल, मोदींनी दिले 'हे' उत्तर

२३ मे नंतर नरेंद्र मोदींचे पॅकअप होणार, असे विरोधक म्हणतात.

Updated: May 9, 2019, 08:44 PM IST
लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला तर काय कराल, मोदींनी दिले 'हे' उत्तर title=

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात असताना गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'झी न्यूज'ला मुलाखत दिली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी देशात पुन्हा भाजपचीच सत्ता येईल, असा दावा केला. एवढेच नव्हे तर २०१४ च्या तुलनेत भाजपच्या जागांची संख्याही वाढेल, असे मोदींनी यावेळी म्हटले. 

'झी न्यूज'चे संपादक सुधीर चौधरी यांनी नरेंद्र मोदींची ही मुलाखत घेतली. यावेळी सुधीर चौधरी यांनी विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या एका दाव्याविषयी नरेंद्र मोदी यांना विचारणा केली. २३ मे नंतर नरेंद्र मोदींचे पॅकअप होणार, असे विरोधक म्हणतात. जर खरंच अशी वेळ आली तर काय कराल, असा प्रश्न मोदींना विचारण्यात आला. त्यावर मोदी यांनी म्हटले की, अशीच वेळ आली तर मी माझी झोळी उचलून कधीही निघायला तयार असेन. मला जवळून ओळखणाऱ्यांना ही गोष्ट चांगली ठाऊक आहे. मात्र, मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की, जनतेने भाजपच्या हातात पुन्हा सत्ता द्यायचे ठरवले आहे. त्यामुळे विरोधक काय विचार करतात, याकडे मी फारसे लक्ष देत नाही. मला जनतेवर पूर्ण विश्वास आहे. विरोधकांना हवी ती स्वप्नं पाहायला मोकळे आहेत. तुम्ही त्यांना आतापासून वास्तवाची जाणीव करून देऊन त्यांचा स्वप्नभंग करू नका, असा टोला मोदींनी लगावला. 

तसेच यावेळी भाजप २०१४ प्रमाणे कामगिरी करु शकेल की नाही, यावरही मोदींनी भाष्य केले. २०१४ मध्येही कोणतीही लाट नसल्याचे अनेकजण म्हणायचे. मात्र, प्रत्यक्षात काय घडले, हे तुम्हाला माहितीच आहे. यावेळीही तसेच घडेल. विरोधकांनी पराभवासाठी आतापासूनच ईव्हीएम यंत्राचे कारण द्यायला सुरुवात केली आहे. मात्र, भारतासारख्या प्रचंड आकारच्या देशात निवडणूक घेणे हीच मोठी गोष्ट असल्याचे मोदींनी सांगितले.