PF खात्यातून पैसे काढण्याची चूक कधीही करु नका! १ लाख काढलेत, तर होणार ११ लाखांचे नुकसान

जर तुम्ही एक लाखाची रक्कम ही खात्यातच राहू दिली असती, तर त्यावर तुम्हाला व्याज मिळाले असते आणि ही रक्कम...

Updated: Aug 17, 2021, 02:49 PM IST
PF खात्यातून पैसे काढण्याची चूक कधीही करु नका! १ लाख काढलेत, तर होणार ११ लाखांचे नुकसान title=

मुंबई : फायनाशिअल एक्सपर्ट्स हे नोकरी करणाऱ्यांना नेहमी एक सल्ला देतात. की, तुम्हाला अत्यंत महत्वाचं काम असेल, तरच पीएफ (Provident Fund) खात्यातून पैसे काढा. जर तुम्ही रिटायरमेंटच्या काही दिवसांआधीच पैसे काढलेत तर तुम्ही तुमचे नुकसान करुन घेतायेत हे लक्षात ठेवा. पीएफ खात्यातील पैसा हा तुमच्या भविष्यासाठी असतो. या फंडातून तुम्ही 1 रुपया सुद्धा काढला तरी त्याचा थेट परिणाम तुमच्या सेवानिवृत्ती निधीवर 11 पट फरक होतो.

जर तुम्ही खात्यातून 1 लाख रुपये काढलेत, तर समजा तुम्ही आपले 11 लाखांचे नुकसान करत आहात. मनी 9 च्या अहवालानुसार, ईपीएफओचे (EPFO) असिस्ंटट कमिश्नर ए. शुक्ला म्हणाले की, निवृत्त होण्यास 30 वर्षांचा कालावधी बाकी असेल आणि तुम्ही खात्यातून 1 लाख रुपये काढलेत. तर तुमच्या सेवानिवृत्ती निधीतून 11.55 लाख रुपये कमी होतील.

अर्थात जर तुम्ही एक लाखाची रक्कम ही खात्यातच राहू दिली असती, तर त्यावर तुम्हाला व्याज मिळाले असते आणि ही रक्कम 11.55 लाखांपर्यंत गेली असती.

अंदाजानुसार, तुम्हाला निवृत्त होण्यास जर 20 वर्षांचा कालावधी राहिला असेल आणि तुम्ही खात्यातून 50 हजार रुपये काढलेत, तर तुम्हाला 2 लाख 5 हजारांचे नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर 1 लाख रुपये काढलेत, तर त्यावर 5 लाख 11 हजार रुपये, दोन लाखांवर 10 लाख 22 हजार रुपये, तीन लाखांवर 15 लाख 33 हजार रुपयाचे नुकसान होते.

त्याचबरोबर तुमच्या निवृत्तीला 30 वर्षांचा कालावधी बाकी असेल आणि तुम्ही 50 हजार रुपये खात्यातून काढलेत तर 5 लाख 27 हजार रुपयांचे नुकसान होऊ शकते. तसेच 1 लाखांवर 11 लाख 55 हजार रुपये, 2 लाखांवर 23 लाख 11 हजार, 3 लाखांवर 34 लाख 67 हजार रुपयांपर्यंतचे नुकसान होऊ शकते.

त्यामुळे तुम्ही पीएफ फंडातून पैसे काढताना दहावेळा विचार करा आणि अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय खात्यातून पैसे काढू नका.

पीएफच्या नियमांनुसार, 7 वर्षांच्या सेवेनंतर स्वत:चे लग्न, मुलांच्या लग्नासाठी जास्तीत जास्त 50 टक्के रक्कम तुम्ही काढू शकता. ही रक्कम एम्प्लॉयी शेअरच्या 50 टक्के असते. शिक्षणासाठी सुद्धा 50 टक्के रक्कम तुम्ही काढू शकता.

घर बांधण्यासाठी किंवा जमीन खरेदी करण्यासाठी 5 वर्षे काम केल्यानंतर या निधीतून पैसे काढता येतात. ही रक्कम मासिक वेतन आणि महागाई भत्त्याच्या 24 पट असू शकते.

गृहकर्जाच्या परतफेडमध्ये 90 % कर्मचारी आणि नियोक्ता हिस्सा काढून घेता येतो. परंतु यासाठी 10 वर्षांची सेवा आवश्यक आहे. घराच्या नूतनीकरणासाठी, मासिक वेतन 12 पट काढता येते. यासाठी किमान 5 वर्षांची सेवा आवश्यक आहे.

वैद्यकीय आणीबाणीच्या प्रकरणांमध्ये, 6 महिने मूलभूत मासिक वेतन आणि महागाई भत्ता काढला जाऊ शकतो. हे कर्मचाऱ्यांच्या हिश्श्यातून काढता येते. नोकरी गमावल्यास, एकूण निधीच्या 75 टक्के रक्कम काढता येते. 57 वर्षे पूर्ण झाल्यावर नोकरी गमावल्यास, सेवानिवृत्ती निधीतून 90% पर्यंत पैसे काढता येतात.