इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'शांती निर्माण करण्याची आणखी एक संधी द्यावी' असे विधान केले. तसेच आपल्या या विधानावर कायम राहणार असल्याचे आश्वासनही इम्रान खान यांनी दिले. जम्मू-काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या पुलवामा हल्ल्याबाबत कोणतेही पुरावे हाती लागले, कोणतीही माहिती मिळाली तर संबंधीतांवर तात्काळ कारवाई करणार असल्याचे त्यांनी मोदींना सांगितले.
'दहशतवादविरोधात संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी आम्ही जलद गतीने पाऊले उचलत आहोत. यावेळी बरोबरीचा हिशोब चुकता केला जाणार. हा बदललेला भारत आहे. हे दुख: सहन केले जाणार नाही. दहशतवादाला कसे नष्ट करायचे हे माहित आहे.' असे विधान राजस्थानमध्ये पंतप्रधान मोदी यांनी एका रॅलीदरम्यान केले होते. मोदींच्या या विधानानंतरच इम्रान खानने मोदींना आणखी एक संधी देण्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानात इम्रान खान पंतप्रधान बनल्यानंतर मोदींनी त्यांना फोनवरून शुभेच्छा देत गरिबी आणि निरक्षरताविरूद्ध लढाई लढण्याविषयी सांगितले होते. त्यावर इम्रान खान यांनी 'मी पठाणचा मुलगा आहे, खरं बोलतो, खरंच वाहतो' असे म्हटले होते. पाकिस्तान पंतप्रधान कार्यालयाने, पंतप्रधान इम्रान खान आपल्या शब्दांवर कायम आहेत. भारताने कारवाई करण्यायोग्य कोणतीही गुप्त माहिती दिली तर त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे सांगण्यात आले आहे.
१४ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेकडून सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी या हल्ल्याला प्रत्युत्तर देणार असल्याचे सांगितले आहे. हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतात तणावपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत. १९ फेब्रुवारीला इम्रान खानने भारताला पुलवामा हल्ल्यात भारताने योग्य ते पुरावे दिल्यास दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.