छोट्या गावातील सुनबाईची मोठी झेप... ISRO च्या Aditya L1 मिशनमध्ये दिलंय मोलाचं योगदान!

Aditya L-1 याला सूर्याच्या L1 बिंदू पर्यंत पोहचण्याच्या संपूर्ण प्रक्रियेस जवळपास चार महिन्यांचा कालावधी लागेल...या मोहिमेमुळे पुढील पाच वर्षांसाठी हे यान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोला मदत करणार आहे. 

वनिता कांबळे | Updated: Sep 3, 2023, 11:44 PM IST
छोट्या गावातील सुनबाईची मोठी झेप... ISRO च्या Aditya L1  मिशनमध्ये दिलंय मोलाचं योगदान! title=

ISRO Aditya L-1 : भारताच्या सूर्य मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण झालं आहे. 2 सप्टेंबर रोजी सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने भारताचे आदित्य L1 यान सूर्याच्या दिशेने झेपावले. ISRO च्या या मोहिमेमुळे आता भारताला सूर्याचा अभ्यास करणं सहज शक्य होणार आहे.  ISRO Aditya L-1 मिशनमध्ये मध्य प्रदेशच्या प्रिया कृष्णकांत शर्माने  महत्वपूर्ण योगदान दिले आहे. 

आदित्य एल1 या सूर्ययानाबरोबर 7 वेगवेगळे पेलोड्स

भारताच्या आदित्य एल1 या सूर्ययानाबरोबर 7 वेगवेगळे पेलोड्स अवकाशात झेपावले आहेत. हे पेलोड सूर्याचा विविध बिंदूंवर अभ्यास करतील. संशोधनातून मिळालेला डेटा आणि सूर्याशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती या पेलोडच्या माध्यमातून मिळणार आहे. विजिबल एमिशन लाइन कोरोनाग्राफ अर्थात VELC हे यातील सर्वात मुख्य आणि अत्यंत महत्वाचे पेलोड आहे. हे पेलोड या मिशनचे हार्ट आहे असेच म्हणावे लागेल. 

VELC पेलोड निर्मितीत प्रिया कृष्णकांत शर्मा यांचा सहभाग

प्रिया सध्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स, बेंगळुरू येथे प्रोजेक्ट इंजिनीअर म्हणून कार्यरत आहेत. याच इन्स्टिट्यूट मध्ये VELC पेलोडची निर्मिती करण्यात आली. या पेलोडच्या ऑप्टिकल डिझाइन विश्लेषण आणि सिम्युलेशनमध्ये प्रिया यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. या पेलोडच्या  ऑप्टिकल चाचणीच्या वेळी ती इस्रोमध्ये देखील उपस्थित होती. आदित्य L-1 हे यान L-1 पॉइंटवर स्थापित केल्यानंतर या (VELC) पेलोडमधून येणार्‍या डेटाचे विश्लेषण करणार्‍या टीममध्ये प्रिया यांचाही समावेश असणारआहे. 

लहानशा कॉलेजमधुन घेतले इंजिनिअरिंगचे शिक्षण

खरगोन येथून प्रिया यांनी इंजिनीअरिंग पूर्ण केले. यानंतर त्यांनी एसजीएसआयटीएस इंदूर येथून ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्समध्ये एम.टेक ही पदवी घेतली. 6 महिने IIT इंदूरमध्येही काम काम केले. यानंतर त्यांची डीआरडीओमध्ये निवड झाली. ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2022 पर्यंत त्यांनी विविध संशोधन केले. यानंतर त्यांची भारतीय खगोल भौतिकी संस्था, बेंगळुरू येथे निवड झाली. VELC पेलोड निर्मीतीच्या टीम मध्ये त्यांची निवड झाली. 

छोट्या गावच्या सुनेची कौतुकास्पद कामगिरी

प्रिया यांचे माहेर मध्य प्रदेशातील माहेर खरगोन जिल्ह्यातील महेश्वर येथे आहे. प्रिया यांचे वडील श्याम गावशिंदे आणि आई गायत्री गावशिंदे हे दोघेही शिक्षक आहेत. त्याचा भाऊ गौरव न्यायालयात नोकरी करतो. प्रिया यांचे प्राथमिक शिक्षणही महेश्वर येथेच झाले. सध्या प्रिया या पती कृष्णकांत शर्मा यांच्यासोबत बेंगळुरूमध्ये राहतात. कृष्णकांत हे ऑटोमेशन इंजिनीअर आहेत.  ते बेंगळुरू येथील एका खासगी कंपनीत काम करतात.  कृष्णकांत हा बरवाह येथील नर्मदा नगर कॉलनी येथील रहिवासी आहे. त्यांचे वडील राकेश शर्मा एका खासगी कंपनीत काम करतात. तर, आई संगीता शर्मा गृहिणी आहेत.