...अन् भारताने मुद्दाम आपलं यान चंद्रावर धडकवलं! चांद्रयान-3 मोहिमेशी खास कनेक्शन

India Intentionally Crashed Its Spacecraft On Moon: भारताने 2019 साली चांद्रयान-2 मोहीम राबवली आणि आता म्हणजेच 2023 मध्ये चांद्रयान-3 मोहीम राबवली जात आहे. मात्र तुम्हाला ठाऊक आहे का यापूर्वी भारताने मुद्दाम एक यान चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश केलं होतं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 21, 2023, 12:00 PM IST
...अन् भारताने मुद्दाम आपलं यान चंद्रावर धडकवलं! चांद्रयान-3 मोहिमेशी खास कनेक्शन title=
भारताने 2008 मध्ये मुद्दाम धडकवलं होतं हे यान (प्रातिनिधिक फोटो)

India Intentionally Crashed Its Spacecraft On Moon: संपूर्ण देशाचं लक्ष सध्या भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेमधील लॅण्डर यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार का याकडे लागलं आहे. चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लॅण्डींगसाठी देशभरातून प्रार्थना केल्या जात आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो क्षणोक्षणाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून देत आहे. भारतासाठी ही मोहीम फार महत्त्वाची आहे. यापूर्वीच्या भारताच्या दोन्ही मोहिमा अपयशी ठरल्या आहेत. भारतासाठी हे दोन्ही फार मोठे धक्के होते. मात्र आता चूका टाळून जे 2019 मध्ये चांद्रयान-2 ला शक्य झालं नाही ते यंदा करुन दाखवण्याचं आव्हान इस्रो समोर आले. मात्र चांद्रयान-2 च्या आधी भारताने चंद्रावर एक यान पाठवलं होतं आणि ते जाणूनबुजून क्रॅश केलेलं हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. त्याबद्दलच जाणून घेऊयात.

क्रॅश झालं तरी यशस्वी मोहीम

यापूर्वी भारताने 2008 मध्ये इस्त्रोने मुद्दाम चंद्राच्या पृष्ठभागावर एक यान कॅश केलं होतं, असं वृत्त 'इंडिया टुडे'नं दिलं आहे. आपल्या या मोहिमेअंतर्गत भारताने 22 ऑक्टोबर 2008 साली चांद्रयान मिशन लॉन्च केलं होतं. याच माध्यमातून भारताने पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर अन्य कोणत्याही खगोलीय गोष्टीवर यान पाठवण्याची आपली क्षमता आहे हे जगाला दाखवून दिलं होतं. तोपर्यंत जगातील केवळ 4 देशांना असं यान पाठवणं शक्य झालं होतं. यामध्ये अमेरिका, रशिया, जपान आणि यूरोपीय राष्ट्रांचं एक संयुक्त यान पृथ्वीच्या कक्षेबाहेर पाठवता आलं होतं. या यादीमध्ये भारत पाचव्या स्थानी होती. इस्रोला आपलं यान मुद्दाम नष्ट करावं लागलं होतं. मात्र या चांद्रयान मोहिमेदरम्यान चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचं दिसून आलं होतं. या मोहिमेमुळे भारताचं नाव यशस्वीपणे चंद्रावर यान पाठवून संशोधन करणाऱ्या देशांमध्ये घेतलं जाऊ लागलं.

32 किलोचं यान धडकलं चंद्रावर

भारताने 2008 साली पाठवलेल्या या यानामध्ये 32 किलोग्रामचं एक विशेष तपास यंत्र होतं. याचा एकमेव उद्देश म्हणजे या यानाचा अपघात घडवून आणणं. याला तांत्रिक भाषेत मून इम्पॅक्ट प्रोब म्हणतात. 17 नोव्हेंबर 2008 रोजी रात्री 8 वाजून 6 मिनिटांनी इस्रोच्या मिशन कंट्रोल रुममधील इंजिनिअर्सने चंद्राच्या प्रभाव तपासून पाहण्यासाठी यान क्रॅश करण्याच्या आदेशाला मंजुरी दिली. काही तासांमध्येच चंद्रावर हे यान कोसळलं. चंद्राच्या पृष्ठभागापासून 100 किलोमीटर उंचीवरुन मून इम्पॅक्ट प्रोबने आपला अंतिम प्रवास सुरु केला. चांद्रयान ऑर्बिटरपासून दूर जाऊ लागल्याने या यानाचं ऑन बोर्ड स्पिनअप रॉकेट सक्रीय झालं. हे रॉकेटच या यानाला आदळण्यासाठी गाइड करु लागलं.

यात होती 3 यंत्रं

यानावरील रॉकेट स्वरुपातील हे इंजिन वेग वाढवण्यासाठी नव्हतं तर वेग कमी करण्यासाठी आणि अपेक्षेप्रमाणे यान क्रॅश होईल यासंदर्भातील काळजी घेण्यासाठी होतं. चंद्राच्या पृष्ठभागाकडे जाताना एखाद्या बुटाच्या बॉक्स एवढा आकार असलेला हा भाग म्हणजे केवळ धातूचा तुकडा नव्हता. या बॉक्ससारख्या गोष्टीच्या आतील भागात 3 यंत्र बसवण्यात आली होती. यामध्ये व्हिडीओ इमेजिंग सिस्टीम, रडार अल्टीमीटर आणि मास स्पेक्ट्रोमीटरचा या बॉक्समध्ये समावेश होता.

यातून मिळालं काय?

हे यान पृष्ठभागाच्या दिशेने झेपावलं त्यानुसार या यंत्रणांनी ऑर्बिटरला डेटा पाठवण्यास सुरुवात केली. या ऑर्बिटरच्या रीडआऊट मेमरी रेकॉर्डमधून पुढे हा डेटा भारतीय वैज्ञानिकांना सखोल अभ्यासाठी उपलब्ध झाला. चांद्रयानापासून निघाल्यानंतर 25 मिनिटांनी मून इम्पॅक्ट प्रोब चंद्राच्या पृष्ठभागावर आदळलं. आता यामधून मिळालं काय असा प्रश्न पडला असेल तर या बॉक्ससारख्या प्रॉबमधील यंत्रांमधून लॅण्डींगच्या वेळेस परिस्थिती कशी असेल याचा अभ्यास करण्यासाठीचा डेटा संशोधकांना मिळाला. या क्रॅशनमधूनच चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3 मोहिमेचा पाया रचला गेला.