कोरोनाशी युद्धास भारत सज्ज : ७ ते ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू

जनतेद्वारा कर्फ्यू लावण्याची देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी वेळ

Updated: Mar 22, 2020, 06:16 AM IST
कोरोनाशी युद्धास भारत सज्ज : ७ ते ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू  title=

नवी दिल्ली : कोरोना वायरशी लढण्यासाठी जनतेद्वारा कर्फ्यू लावण्याची देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी वेळ येतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर सारा देश जनता कर्फ्यूसाठी सज्ज झालाय. मुंबईमध्ये याची सुरुवात देखील झाली आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता आजपासून ३१ मार्चपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता मुंबई बंद असणार आहे.

पंतप्रधानांचे आवाहन 

जनता कर्फ्यु लागू झाल्यानंतर नागरिकांनी सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत घरातून बाहेर पडू नये.  हा कर्फ्यु म्हणजे जनतेसाठी जनतेकडून स्वत:वर लादून घेण्यात आलेला कर्फ्यु असेल. हा कर्फ्यु म्हणजे कोरोनाविरुद्ध लढण्याच्या आपल्या आत्मसंयमाचे प्रतिक असेल, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. 

सजग आणि सावध राहा

कोरोनाचे संकट हे एखादे राज्य किंवा देशापुरते मर्यादित नाही. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्यावेळीही जगातील सर्व देशांना झळ पोहोचली नव्हती. मात्र, कोरोनाच्या रुपाने यावेळी संपूर्ण मानवजातीसमोरच संकट उभे ठाकले आहे. आतापर्यंत भारताने या संकटाचा निर्धाराने सामना केला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून देशात आपण कोरोनाच्या संकटापासून वाचलोय किंवा आपल्याकडे सर्वकाही ठीक आहे, असे वातावरण नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. परंतु, आपण कोरोनाच्याबाबतीत अशाप्रकारे निश्चिंत राहणे कदापि परवडण्यासारखे नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सजग आणि सावध राहिले पाहिजे.

महाराष्ट्र लॉकडाऊन ?

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून (Maharashtra Government) सर्वकाही उपाय-योजना करण्यात येत आहे. मात्र, काही लोक राज्यसरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत आहेत. दरम्यान, देशात राज्यस्थान हे राज्य लॉकडाऊन करण्यात आले आहे. आता महाराष्ट्रात हालचाली सुरु आहेत. अनेकदा सूचना देऊन, विनंती करुनही म्हणावी तशी गर्दी कमी होत (Corona crisis) नसल्याने राज्य सरकार महाराष्ट्र लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) करण्याबाबत गंभीर असून उच्चपातळीवर विचार सुरु आहे.  उद्याच्या (रविवार) जनता कर्फ्यूनंतर (Janata Curfew) राज्य सरकार राज्यातील स्थितीचा सखोल आढावा घेणार आहे. त्यानंतर सोमवारी राज्य सरकारची उच्चस्तरीय बैठक होईल. या बैठकीत राज्य लॉकडाऊन करण्याबाबत चर्चा होणार आहे. तसेच परिस्थितीचा आढावा घेऊन सरकार राज्य लॉकडाऊनचा विचार करणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

गंभीर बाब

गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे अर्थात सोशल डिस्टन्सिंग अत्यंत आवश्यक आणि प्रभावी मंत्र आहे. तसेच नागरिकांनी स्वत:सोबत इतरांनाही स्वस्थ ठेवण्याच संकल्प केला पाहिजे. या दोन गोष्टींच्या बळावर आपण कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करू शकतो. आतापर्यंत ज्या देशांमध्ये कोरोनाचा जास्त प्रभाव दिसून आला आहे, त्याठिकाणी एक बाब प्रकर्षाने आढळून आली. ती म्हणजे सुरुवातीच्या दिवसांत याठिकाणी कोरोनाच्या प्रादुर्भावाचा वेग सामान्य होता. मात्र, नंतरच्या टप्प्यात या देशांमध्ये अचानक विस्फोट झाल्याप्रमाणे प्रचंड वेगाने कोरोनाची लागण झाली. त्यामुळे भारतासारख्या १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशाच्यादृष्टीने ही सामान्य बाब नाही. विकसित देशांमध्येही कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे भारतात काहीच होणार नाही, अशा भ्रमात राहणे अत्यंत चुकीचे ठरु शकते.