पुढील तीन दिवस हलका ते मुसळधार पावसाचा अंदाज, त्यानंतर तापमानात घट

India Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची बातमी.  23 ते 25 मे दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून त्यानंतर उकाडा कमी होण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली, वायव्य भारतातील अनेक भागांमध्ये प्रामुख्याने हा पाऊस मेघगर्जनेसह पडण्याचा अंदाज आहे.

सुरेंद्र गांगण | Updated: May 23, 2023, 03:51 PM IST
पुढील तीन दिवस हलका ते मुसळधार पावसाचा अंदाज, त्यानंतर तापमानात घट title=

India Weather Update :  उकाड्यापासून हैराण झालेल्यांसाठी चांगली बातमी. लोकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. हवामान खात्याने (IMD) येत्या काही दिवसांत भारताच्या बहुतांश भागात हलक्या ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागराच्या काही भागात नैऋत्य मोसमी वारे पुढे सरकल्याने पुढील तीन दिवस पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.  

23 ते 25 मे दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर उकाडा कमी होण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली, वायव्य भारतातील अनेक भागांमध्ये प्रामुख्याने हा पाऊस मेघगर्जनेसह होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर तापमानात घट होण्याची शक्यता आहे. आठवडाभर  उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आज दिलासा मिळणार आहे. 

विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

विदर्भात पावसाचा जोर असण्याची शक्यात हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच आसाम आणि मेघालयच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे. तर जम्मू काश्मीर, लडाख, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेशसह सिक्किममध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जोरदार वाऱ्यासह  पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. डोंगराळ भागात हवामानात बदल पाहायला मिळणार आहे. उत्तराखंडच्या अनेक भागात सध्या वातावरण खराब आहे. 

केदारनाथ, तुंगनाथ, मध्यमहेश्वर, कार्तिक स्वामीसह उंच  भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रा सुरु असून खराब वातावरणामुळे भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. केदारनाथमध्ये पावसामुळे भाविकांना अनेक अडचणी येत आहेत. तर राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात पावसाची शक्यता आहे.  उत्तरप्रदेशमधील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.  26 मे पर्यंत पावसाची शक्यता आहे. या दरम्यान वारे प्रतितास 40-45 किलोमीटर  वेगाने वाहण्याची शक्यता आहे.

 कोकण भागात तसेच दक्षिणेकडील राज्यात उष्णता कायम

राज्यात काही ठिकाणी तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. 40 अंशाच्यावर तापमानाची नोंद करण्यात आली आहे. रविवारपर्यंत आणि छत्तीसगड आणि झारखंडमध्ये मंगळवारपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, पुढील पाच दिवसांत आर्द्र हवा आणि उच्च तापमानामुळे कोकण भागात तसेच केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातही उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे.

मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तापमान 40 अंशावर पोहचले आहे. अकोला, नाशिक, चाळीसगाव, संभाजीनगर, बीड, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचं तापमान 42 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. याशिवाय राज्यातील तब्बल 20 जिल्ह्याचं तापमानाने चाळीशी ओलांडल्याने नागरिकांच्या जीवाची लाही-लाही होत आहे.