भारताकडून पाकिस्तानचा बुरखा फाडण्याची तयारी, जगासमोर आणणार खरा चेहरा

पाकिस्तानचा खरा चेहरा आणण्यासाठी भारताची विविध देशांच्या राजदुतांसोबत चर्चा

Updated: Nov 23, 2020, 09:45 PM IST
भारताकडून पाकिस्तानचा बुरखा फाडण्याची तयारी, जगासमोर आणणार खरा चेहरा
Photo: PTI

नवी दिल्ली : नगरोटा येथील दहशतवाद्यांचा कट उद्ध्वस्त केल्यानंतर भारताने आता संपूर्ण घटनेत पाकिस्तानची भूमिका संपूर्ण जगासमोर आणण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. नगरोटा हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून मिळालेले पुरावे आणि भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेले पुरावे जगातील सर्व देशांसमोर आणले जात आहेत. स्वत: परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला यांनी आता ही जबाबदारी घेतली आहे.

श्रृंगला यांनी रशिया, अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सच्या राजदूतांना माहिती दिली आहे. सोमवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (यूएनएससी) च्या चार कायमस्वरुपी सदस्यांच्या नवी दिल्लीतील राजदूतांना नगरोटा हल्ल्याच्या कट रचल्याची माहिती दिली. या ब्रिफिंगमध्ये चीनच्या राजदूतांचा समावेश नव्हता.

परराष्ट्र सचिवांनी अमेरिका, रशिया, ब्रिटन आणि फ्रान्सच्या राजदुतांना याबाबत संपूर्ण माहिती दिली आहे, तर अन्य सचिव त्यांच्या क्षेत्रातील  राजदुतांना याबाबत माहिती देत ​​आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायासमोर जास्तीत जास्त माहिती सामायिक करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये प्रवेश कसा केला, त्यांच्याकडे शस्त्रे कशी होती आणि पाकिस्तानशी त्यांचे संपर्क कसे आहेत यासारख्या नगरोटा हल्ल्याच्या कटाशी संबंधित प्रत्येक लहान माहिती भारत या देशांना देत आहे.

नगरोटा हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांचा संबंध पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैशशी होता. स्थानिक पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी हस्तगत केलेली शस्त्रे आणि इतर उपकरणे, पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याचेही ते सांगत आहेत. ठार झालेल्या दहशतवाद्यांची भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्याची तयारी होती.

ठार झालेल्या दहशतवाद्यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा हल्ल्याप्रमाणे भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला होता. या हल्ल्यामुळे दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात सुरू असलेल्या लोकशाही प्रक्रियेचा नाश करायचा होता आणि २६/११ मुंबई हल्ल्याच्या निमित्ताने दहशत वाढवायची होती.

अशा दहशतवादी हल्ल्याचे गंभीर परिणाम कसे होऊ शकतात हे सर्व राजदूतांना भारताकडून सांगितले जात आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय समुदायाला दिलेले वचन कसे मोडतो आणि सीमेपलिकडे दहशतवादाला प्रवृत्त कसा करतो. हे भारत जगासमोर आणत आहे. दोन दिवसांपूर्वी भारताने पाकिस्तानचे उच्चायुक्त यांना बोलावून या दहशतवादी हल्ल्यात सामील असल्याबद्दल पाकिस्तानला फटकारले.

गेल्या गुरुवारी भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी नगरोटा येथे चार दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधून घुसखोरी केली. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा हात यामध्ये होता. मसूद अजहर आता कुठे आहे यावर पाकिस्तानने पूर्ण मौन बाळगले आहे. संयुक्त राष्ट्र संघाने अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यापासून पाकिस्तानमधून कोणतीही बातमी मिळाली नाही. 

काश्मीरमध्ये हल्ला करण्यासाठी अझर आपल्या भावासोबत पाकिस्तान सैन्याच्या मदतीने काम करत आहे. यासाठी तो दहशतवाद्यांचा गट तयार करत आहे. अशी माहिती पुढे आली आहे.