नवी दिल्ली: लडाखच्या गलवान खोऱ्यात सोमवारी मध्यरात्री झालेल्या तुफान झटापटीनंतर भारत आणि चीन या दोन्ही देशांनी परिसरातून आपले सैन्य माघारी बोलावले आहे. भारतीय लष्कराकडून यांसदर्भात माहिती देण्यात आली. १५\१६ जूनला भारतीय आणि चिनी सैनिक एकमेकांना भिडले. यावेळी दोन्ही बाजूच्या सैनिकांनी एकमेकांवर लोखंडी रॉड आणि दगडांनी हल्ला चढवला. या तुंबळ हाणामारीत दोन्ही बाजूचे अनेक जवान गंभीर जखमी झाले. आज दुपारीच भारताच्या एका कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्यासह दोन जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, काहीवेळापूर्वीच उपचारादरम्यान आणखी १७ भारतीय जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे शहीदांचा आकडा २० वर पोहोचला आहे.
भारत-चीन तणाव | जाणून घ्या 'फिंगर ४'ची भौगोलिक स्थिती
जवळपास १७ भारतीय जवान कालच्या झटापटीत गंभीर जखमी झाले होते. त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. मात्र, गलवान खोऱ्यात सध्या तापमानाचा पारा शून्य अंशाच्याही खाली आहे. त्यामुळे अनेक जखमी भारतीय जवानांचा मृत्यू झाल्याचे समजते.
चीनशी लढताना शहीद झालेले 'ते' भारतीय जवान कोण?
दरम्यान, भारतीय जवानांनीही चिनी सैन्याला जोरदार तडाखा दिला आहे. भारतीय यंत्रणांच्या माहितीनुसार, या झटापटीत चीनचे ४३ जवान मृत्युमूखी पडले आहेत. तर अनेक चिनी जवान गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर सध्या भारत आणि चीन दोन्ही देशांतील लष्करी आणि राजकीय हालचालींना वेग आला आहे. गलवान खोऱ्याच्या परिसरात चिनी हेलिकॉप्टर्सची ये-जा मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे भारत-चीन सीमेवरील तणाव शिगेला पोहोचला आहे.