Ayodhya Ram Mandir : सध्या देशाच्या प्रत्येक गल्लीबोळात रामनामाचा जप ऐकू येत आहे. 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जगभरातून नेते, अभिनेते आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे. काही जणांना या सोहळ्यासाठी आमंत्रित न केल्याने टीका केली जात आहे. विरोधी पक्षांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदींचा विरोध करत या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक राजकीय अजेंडा असल्याचे विरोधकांचे म्हणणं आहे. अशाच भारताचा माजी क्रिकेटपटू आणि आम आदमी पक्षाचा खासदार हरभजन सिंगने या सोहळ्याला हजेरी लावण्याचं ठरवलं आहे.
महेंद्र सिंह धोनी, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन यांच्यासह अनेक भारतीय क्रिकेटपटूंना 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी आमंत्रण मिळाले आहे. क्रिकेटपटू आणि आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार हरभजन सिंगने या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे सांगितलं आहे. कोणी जावो अथवा न जावो, मी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जाणारच, असे हरभजनने सांगितलं आहे. या कार्यक्रमाला जनतेने मोठ्या संख्येने यावे, असे आवाहनही हरभजनने केले आहे.
काय म्हणाला हरभजन सिंग?
"कोण काय म्हणतो हा वेगळा मुद्दा आहे. राम मंदिराच्या कार्यक्रमाला कोणाला जायचे आहे की नाही याने मला काही फरक पडत नाही, काँग्रेसला जायचे आहे की नाही, इतर पक्षांना जायचे आहे की नाही त्याने मला फरक पडत नाही. पण मी नक्की जाईन. हा माझा दृष्टीकोन आहे आणि देवावर विश्वास ठेवणारी व्यक्ती म्हणून मी उभा आहे. माझ्या (राममंदिरात) जाण्यात कोणाला काही अडचण असल्यास ते त्यांना हवे ते करू शकतात," असे हरभजनने म्हटलं आहे.
"देशातील जनतेला माझ्या शुभेच्छा. प्रभू राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून आशीर्वाद घ्यावा. हा ऐतिहासिक दिवस आहे. ते सर्वांचे आहे. प्रभू रामाचे मंदिर त्यांच्या जन्मस्थानी बांधले जात आहे ही मोठी गोष्ट आहे. सर्वांनी जावे," असेही हरभजन सिंग पुढे म्हणाला.
दुसरीकडे, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनाही पाठवण्यात आले आहे. मात्र, या दिवशीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास त्यांनी नकार दिला आहे. 22 जानेवारीनंतर आपण संपूर्ण कुटुंबासह अयोध्येला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने 22 जानेवारीला निमंत्रणावर एक किंवा दोन लोकांनाच तिथे जाण्याची परवानगी आहे. अशा परिस्थितीत 22 जानेवारीनंतर मी माझ्या संपूर्ण कुटुंबासह अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे केजरीवाल यांनी म्हटलं आहे.