पाकिस्तानातील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारियांना दिल्लीतून तातडीचे बोलावणे

पाकिस्तानचे उच्चायुक्त सोहेल महमूद यांना समन्सही बजावण्यात आले.

Updated: Feb 15, 2019, 04:37 PM IST
पाकिस्तानातील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारियांना दिल्लीतून तातडीचे बोलावणे title=

नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून हरप्रकारे पाकिस्तानची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. या सगळ्याचे पडसाद दिल्लीतील राजनैतिक वर्तुळात उमटताना दिसत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, काही वेळापूर्वीच पाकिस्तानमधील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांना मायदेशात परतण्याचे आदेश दिले आहेत. अजय बिसारिया यांच्याकरवी पाकिस्तानला संदेश धाडला जाऊ शकतो. त्यासाठीची सल्लामसलत करण्यासाठी बिसारिया यांना दिल्लीत पाचारण करण्यात आल्याचे समजते. 

तत्पूर्वी भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पाकिस्तानचे उच्चायुक्त सोहेल महमूद यांना समन्स बजावले. यामध्ये पाकिस्तानने लवकरात लवकर जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेविरुद्ध कारवाई करावी, असे म्हटले आहे. 

दरम्यान, आज सकाळीच दिल्लीत पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडण्यासाठी राजनैतिक कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशन हा दर्जाही भारताने रद्द केला होता. जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) स्थापनेनंतर भारताने पाकिस्तानला १९९६ मध्ये एमएफएनचा दर्जा दिला होता. पाकिस्तानकडून मात्र भारताला असा कोणताच दर्जा दिला गेला नव्हता.