ऋषी कुमार शुक्ला सीबीआयचे नवे संचालक

ऋषी कुमार शुक्ला यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयचे नवे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Updated: Feb 2, 2019, 08:10 PM IST
ऋषी कुमार शुक्ला सीबीआयचे नवे संचालक title=

नवी दिल्ली : ऋषी कुमार शुक्ला यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयचे नवे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ऋषी कुमार शुक्ला मध्य प्रदेशचे पोलीस महासंचालक आहेत. १९८३ च्या तुकडीचे भारतीय पोलीस सेवेतले अधिकारी असलेले ऋषी कुमार शुक्ला यांना सीबीआयचे संचालक म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे. आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांच्यामधल्या वादानंतर हे पद खाली होतं.

याआधी सीबीआय प्रमुखाच्या निवडीसाठी झालेल्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नव्हता. सीबीआयच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती होणार याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवड समितीसोबत घेण्यात आलेली बैठकही अनिर्णित राहिली. या समितीचे सदस्य असणाऱ्या मल्लिकार्जुन खर्गे यांची हरकत असतानाही, ऋषी कुमार यांची सीबीआयच्या संचालकपदी निवड करण्यात आली.

तीन सदस्यांच्या निवड समितीच्या दुसऱ्या बैठकीदरम्यान सरकारनं जी नावं पुढे ठेवली, त्या नावावर मल्लिकार्जुन खर्गे यांनी आक्षेप घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी या समितीचे अध्यक्ष आणि न्यायमूर्ती सिक्री आणि मल्लिकार्जुन खर्गे या समितीचे सदस्य आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून सीबीआयमध्ये मोठं नाट्य घडलं होतं. यावरून मोदी यांच्या मर्जीतील अधिकारी राकेश अस्थाना यांच्याविरोधात चौकशी लावल्याने वर्मा यांना तडकाफडकी बदली करण्यात आली होती.

बदलीच्या या निर्णयानंतर वर्मा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत पुन्हा सीबीआय संचालक पद मिळविले होते. मात्र, त्यांची याच दिवशी मोदी यांनी बदली करत होमगार्डच्या संचालकपदी नियुक्ती केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवड समितीचे अध्यक्ष आहेत. तसंच न्यायमूर्ती सिक्री आणि लोकसभेतील विरोधी पक्षाचे गटनेते मल्लिकार्जुन खर्गे हे दोन सदस्य आहेत. वर्मा यांच्या बदलीला सिक्री यांनी मोदींच्या बाजुने मत दिले होते, तर खर्गे यांनी विरोध केला होता. या बैठकीत ८० अधिकाऱ्यांच्या नावांच्या यादीवर चर्चा झाली, आणि यातून ऋषी कुमार शुक्ला सीबीआयचे नवे संचालक म्हणून निवडले गेले.