चंद्राच्या दक्षिण पृष्ठभागावर पुन्हा एकदा रात्र होणार आहे. पण अद्यापही इस्रोला झोपेत असणाऱ्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरशी संपर्क साधण्यात यश आलेलं नाही. याचा अर्थ थोडक्यात आता चांद्रयान 3 मोहीम संपणार आहे. तीन ते चार दिवसांत शिवशक्ती पॉईंटवर अंधार होणार आहे. विक्रम आणि प्रज्ञान रोव्हर झोपेतून जागे होण्याच्या सर्व आशा आता संपल्या आहेत. पण चांद्रयान 3 त्या प्रोपल्शन मॉड्यूलकडून (Propulsion Module- PM) अद्यापही आशा कायम असणार आहेत.
चांद्रयान 3 चं प्रोपल्शन मॉडेल सलग 58 दिवसांपासून चंद्राभोवती फेऱ्या मारत आहे. त्याने आतापर्यंत अनेक माहिती पाठवली आहे. यामध्ये एक यंत्र लावण्यात आलं आहे, ज्याचं नाव SHAPE असं आहे. याचा अर्थ स्पेक्ट्रो-पोलॅरीमेट्री ऑफ हैबिटेबल प्लॅनेट असा आहे. हे यंत्र अतंराळातील छोट्या ग्रहांचा शोध घेत आहे. तसंच एक्सोप्लॅनेट्स म्हणजेच सौरमंडळाच्या बाहेर असणाऱ्या ग्रहांचाही शोध घेणार आहे.
शेपच्या सहाय्याने इतर ग्रहांवर मानवी आयुष्य अस्तिवात आहे का किंवा तिथे माणूस वास्तव्य करु शकतो का याची पडताळणी केली जाणार आहे. हे पेलोड सतत काम करत असून, आतापर्यंत भरपूर डेटा जमा केला आहे. ग्रहांच्या पडताळणीसाठी नियर-इंफ्रारेड (NIR) वेवलेंथचा वापर केला जात आहे. म्हणजेच चंद्राच्या चारही बाजूंनी प्रदक्षिणा घालताना हे सौरमंडळाच्या बाहेरील ग्रहांचा अभ्यास करत आहे. फक्त यामध्ये एकच अडचण आहे. ती म्हणजे जेव्हा ते पृथ्वीच्या व्हिजिबर रेंजमध्ये येतं तेव्हाच ऑन म्हणजे सुरु होतं.
व्हिजिबल रेंज म्हणजे जेव्हा त्यातून सहजपणे डेटा मिळू शकतो. आता ते अशाच प्रकारे काम करत राहणार आहे. इस्रोही त्याला सतत ऑपरेट करत राहणार आहे. आतापर्यंत जो डेटा जमा झाला आहे, त्याची पडताळणी केली जात आहे. पण यात काही महिने लागू शकतात. यानंतर शेपने सौरमंडळ आणि त्याच्या बाहेर नेमका कोणता शोध लावला आहे याची माहिती मिळेल. तसंच त्याचा मानवाला काही फायदा होणार आहे की नाही हेदेखील स्पष्ट होईल.
चांद्रयान 3 च्या प्रोपल्शन मॉड्यूलचं काम विक्रम लँडरला चंद्राच्या सर्वात जवळच्या कक्षेपर्यंत घेऊन जाणं होतं. यानंतर वेगळं होऊन चंद्राला प्रदक्षिणा घालण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. ही जबाबदारी तो चांगल्या रितीने पार पाडत आहे. यामुळे इस्रोचे वैज्ञानिक त्याचा पुरेपूर फायदा उचलत आहेत. हे किमान चार ते पाच महिने काम करणार आहेत. पण त्यातील इंधन पाहता पुढील अनेक वर्षं ते काम करेल अशी आशा आहे.