श्रीनगर : जम्मूच्या पुंछ आणि राजौरीमध्ये गेल्या 17 दिवसांपासून दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या ऑपरेशनवर मोठा खुलासा झाला आहे. झी मीडियाला सुरक्षा यंत्रणांच्या सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की, दहशतवाद्यांच्या एका गटाने नियंत्रण रेषेवरून (LOC) जम्मूमार्गे खोऱ्यात प्रवेश करण्याचा कट आखला होता. यानंतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कराच्या काउंटर इनफिल्टरेशन आणि काउंटर टेररची तुकडी राजौरी आणि पुंछमध्ये शोध मोहिमेत तैनात करण्यात आली होती.
आतापर्यंत 9 जवान शहीद
या महिन्यात 11 ऑक्टोबर रोजी पूंछच्या डेरा की गलीमध्ये दहशतवाद्यांसोबत लष्कराची चकमक झाली होती, ज्यामध्ये 5 जवान शहीद झाले होते. तीन दिवसांनंतर मेंढर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 4 जवान शहीद झाले. आतापर्यंत एकूण 9 जवान दहशतवादी हल्ल्याचे बळी ठरले आहेत.
दहशतवाद्यांचा गट खोऱ्यात घुसण्याचा प्रयत्नात
सुरक्षा यंत्रणांशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 6 दहशतवाद्यांचा एक गट जम्मूच्या राष्ट्रीय महामार्गावरून खोऱ्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. अशीही शक्यता आहे की, दहशतवाद्यांनी पुन्हा पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) प्रवेश केला असेल. तरीही शोध मोहीम सुरू आहे.
250 दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात
गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार, नियंत्रण रेषेवर तयार करण्यात आलेल्या लॉन्चिंग पॅडवर मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांची उपस्थिती दिसून येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सुमारे 250 दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात आहेत. नियंत्रण रेषेवर बर्फवृष्टी होण्याआधी आणि घुसखोरीचे मार्ग बंद करण्याआधी, मोठ्या प्रमाणात दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, सीमेवर लष्कर आणि बीएसएफच्या कडेकोट बंदोबस्तामुळे दहशतवाद्यांना फारसे यश मिळत नाही.
पीओकेमध्ये दहशतवादी तळांची संख्या वाढली
सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून पाकव्याप्त काश्मीर (POK) मध्ये असलेल्या दहशतवादी तळात खळबळ उडाली आहे आणि त्यांचे सूत्रधार भारतात दहशतवाद्यांना घुसवण्याचा कट रचत आहेत. झी मीडियाला मिळालेल्या विशेष माहितीनुसार, पीओकेमध्ये तीन नवीन दहशतवादी छावण्या सक्रिय झाल्या आहेत, ज्यामुळे दहशतवादी तळांची संख्या आता 17 वरून 20 झाली आहे.
घुसखोरीच्या कटात आयएसआयचा हात
सुरक्षा एजन्सीशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना घुसवण्याचा कट रचला आहे. तालिबानच्या हातात असलेली शस्त्रास्त्रे लष्कर आणि जैशच्या दहशतवाद्यांना दिली जात असल्याची भीती सुरक्षा यंत्रणांना आहे. इतकंच नाही तर ISI काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलांवर हल्ले करण्याचा कट रचत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेवर (एलओसी) तयार करण्यात आलेल्या लाँचिंग पॅडवर दहशतवाद्यांची संख्या वाढत आहे आणि ते भारतात घुसखोरी करण्याचा सतत प्रयत्न करत आहेत. जम्मूला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवरूनही दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून जम्मूला लक्ष्य करता येईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीओकेच्या ज्या दहशतवादी छावण्यांमध्ये लष्कर आणि जैशच्या दहशतवाद्यांची अधिक हालचाल दिसून येत आहे ते बोई, मुझफ्फराबाद, कोटली, बर्नाला, लका-ए-गैर, शेरपाई, देवलीन, खालिद बिन वालिद, गढी आणि दुपट्टा हे कॅम्प आहेत.