मुंबई : 'अभिनेते ' कालांतराने 'नेते' होणं ही काही आजकाल आश्चर्याची बाब राहिली नाही. अनेक कलाकार मंडळी 'नेते'पदही सहज निभावतात.
प्रसिद्ध अभिनेता कमल हसनदेखील लवकरच राजकारणात प्रवेश करण्याच्या बातम्या पसरत आहेत. नुकताच कमल हसनच्या एका इंटर व्ह्यूची सोशल मिडियामध्ये चर्चा आहे. पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नांना कमल हसन यांनीदेखील तितक्याच चतुराईने उत्तरं दिली आहेत.
पत्रकाराने कमल हसन यांना विचारले की तुम्ही प्रामुख्याने काळे कपडे घालता, मग तुमच्या आतमध्ये कोणते खास रंगही आहेत ? यावर कमल हसन म्हणाले, आमच्या आतमध्ये सारे रंग आहेत. त्यावर पत्रकाराने भगवा रंग आहे का ? असे विचारले असता मी सांगितल्याप्रमाणे माझ्यात सारे रंग आहेत. असे सांगत कमल हसन यांनी हा प्रश्न टोलावला.
कमल हसन यांनी आपला राजकारणात येण्याचा विचार आहे. तसेच तो निर्णय योग्यवेळी घेतला जाईल आणि मी पूर्णवेळ राजकारणात असेन असेही कमल हसन यांनी स्पष्ट केले आहे.
काही दिवसांपूर्वी कमल हसन आणि आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांची भेट झाली होती. कमल हसन नवा पक्ष सुरू करण्याऐवजी दक्षिण भारतातील आम आदमी पार्टीचेही काम सांभाळू शकतात. अशा चर्चादेखील रंगल्या होत्या.
तामिळनाडूमध्ये येत्या काही महिन्यात स्थानिक निवडणूका आहेत. या निवडणूकांची संधी साधून कमल हसन त्यांची राजकीय भूमिका मांडतील हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.