बंगळुरू : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक निकालानंतर सुरू झालेल्या राजकीय कलहाचा अद्याप शेवट झालाच नाही. सरकार स्थापनेसाठी भाजपने कर्नाटकमध्ये अनेक प्रयत्न केले. या राजकीय नाट्यात भाजपने काँग्रेस आणि जेडीएसचे आमदारही गळाला लावण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आमदारांना पैशाचे आमिश दाखवण्याचा प्रयत्न केला गेल्याचे आरोप करण्यात आले. दरम्यान, भाजपने काँग्रेसच्या एका आमदाराच्या पत्नीलाही त्याबाबत फोन केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, या आमदाराने फेसबुकवर एक पोस्ट लिहीली आहे. या पोस्टमध्ये आपल्या पक्षाकडून भाजपवर केलेला आरोप फेटाळून लावला आहे. येल्लापुरचे काँग्रेस आमदार शिवराम हेब्बार यांनी म्हटले आहे की, वृत्तवाहिन्यांवर एक व्हिडिओ चालवला जात आहे. ज्यात येडियुरप्पा सरकारला हेब्बार यांनी पाठिंबा देण्यासाठी हेब्बार यांच्या पत्नीकडे अनेक ऑफर्स दिल्या जात असल्याचे दिसते. पण, हेब्बार यांनी हा व्हिडिओ चुकीचा असून त्या क्लिपमधील आवाज आपल्या पत्नीचा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शिवराम हेब्बार यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, मला या प्रकरणाची कल्पना नव्हती. पण, प्रसारमाध्यमातूनच या प्रकरणाची माहिती आपल्याला मिळाली. आपल्या पत्नीला भाजपकडून आमिश दाखवल्याचे या क्लिपमद्ये दिसते. पण, असे काहीच घडले नाही. भाजपकडून असा कोणत्याही प्रकारचा फोन आपल्या पत्नीला आला नाही. अशा प्रकारचा खोटी ऑडिओ क्लिप प्रसारीत करणाऱ्यांचा आम्ही धिक्कार करतो. आपल्याला विजय मिळवून देणाऱ्या जनतेचे आभार मानतो असेही हेब्बार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कर्नाटकमध्ये विधानसभेत भाजप १०४, काँग्रेस ७८, जेडीएस ३७ आणि अपक्ष २ अशी पक्षीय बलाबल आहे. कर्नाटकमध्ये भाजपला बहुमत सिद्ध करता आले नाही. परिणामी येडियुरप्पा यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ आता केवळ दीड दिवसांचा राहिला आहे. आता जेडीएस आणि काँग्रेस विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहेत.