कर्पूरी ठाकूर यांना मिळणार भारतरत्न पुरस्कार, कोण आहेत? जाणून घ्या

Bharat Ratna Karpuri Thakur: भारतरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jan 23, 2024, 08:52 PM IST
कर्पूरी ठाकूर यांना मिळणार भारतरत्न पुरस्कार, कोण आहेत? जाणून घ्या  title=

Bharat Ratna Karpuri Thakur: भारतरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. त्यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. त्यांनी आदिवासी आणि दलितांसाठी केलेल्या कार्याचा हा गौरव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. 

कर्पूरी ठाकूर यांच्या 100 व्या जयंतीपूर्वी त्यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. जनता दल युनायटेड (JDU) ने कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती.

भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक, राजकारणी आणि बिहार राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अशी कर्पूरी ठाकूर यांची ओळख आहे. कर्पूरी ठाकूर हे दोन वेळा बाहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांना जन-नायक म्हटले गेले. 

काय म्हणाले पंतप्रधान?

भारत सरकारने सामाजिक न्यायाचे महान नेते कर्पूरी ठाकूरजी यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतल्याचे पंतप्रधान आपल्या ट्विटमध्ये म्हणाले. कर्पूरी ठाकूरजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त घेतलेला हा निर्णय देशवासियांना अभिमान वाटेल. मागासलेल्या आणि वंचितांच्या उन्नतीसाठी कर्पूरीजींची अतूट बांधिलकी आणि दूरदर्शी नेतृत्वाने भारताच्या सामाजिक-राजकीय परिदृश्यावर छाप सोडल्याचे ते म्हणाले. हा भारतरत्न त्यांच्या अतुलनीय योगदानाची विनम्र ओळख असून समाजात एकोपा वाढीस लागेल,असेही ते म्हणाले.

भारतातील ब्रिटीश राजवटीत समस्तीपूर येथील पितौंझिया हे कर्पूरी ठाकूर यांचे गाव होते. या गावाला आता कर्पूरग्राम म्हणून संबोधले जाते. न्हावी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. जननायक जींच्या वडिलांचे नाव गोकुळ ठाकूर आणि आईचे नाव रामदुलारी देवी होते. 

त्यांचे वडील गावातील अल्पभूधारक शेतकरी होते आणि त्यांच्या पारंपारिक व्यवसायात त्यांनी न्हावी म्हणून काम केले. भारत छोडो आंदोलनात त्यांनी 26 महिने तुरुंगात घालवले. 22 डिसेंबर 1970 ते 2 जून 1971 आणि 24 जून 1977 ते 21 एप्रिल 1979 या काळात त्यांनी दोनदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले.