तिरुवअनंतपूरम : जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर काही प्रसंग आणि परिस्थितींचा सामना आपल्याला करावा लागतो. मग ते कोणते निर्णय घेणं असो किंवा स्वत:चं अस्तित्वं सिद्ध करणं असो. ठराविक वयात ठराविक गोष्टी करण्याची प्रत्येकाचीच विशलिस्ट असते. पण, अनेकदा स्वप्नांचा पाठलाग करता करता माणसं स्वत:लाही वेळ द्यायला विसरुन जातात. मग असा एक प्रसंग येतो जेव्हा याची जाणीव होते आणि याच जाणिवेपोटी सुरुवात होते एका नव्या प्रवासाची.
प्रवास.... जीवनात खूप काही शिकवणारा, बरंच काही देणारा आणि खूप काही आपल्याकडून घेणारा असा हा प्रवास. या प्रवासाच्याच बळावर अनेकजण मोठे झाले आहेत. अशाच नव्या वाटेवर जाण्याचा निर्णय केरळमधील थ्रिसूर येथे राहणाऱअया एका जोडीनं घेतला आहे.
मनात आलेल्या विचाराचा पाठलाग करत हरिकृष्णन जे आणि लक्ष्मी कृष्णन या जोडीनं साचेबद्ध वेळांमध्ये असणाऱ्या त्यांच्या नोकऱ्या सोडल्या आणि जीवनाला साहसी दृष्टीकोनानं पाहण्यासाठी म्हणून एका अविस्मरणीय प्रवासाची सुरुवात केली.
क्रॉस कंट्री रोडट्रीप करण्याच्या त्यांच्या या निर्णय़ात कुटुंबीय आणि मित्रांची मदत झाली. त्यांचा पाठिंबा मिळाला. 2.5 लाख रुपयांच्या बजेटमध्ये त्यांनी हा प्रवास करण्याचं ठरवलं. यासाठी त्यांनी आपल्या कारचीच निवड केली. जिच्या बॅकसीटला बेडमध्ये रुपांतरित केलं. त्यांनी सोबत 10 लीटरचे तीन कॅन भरुन पाणी आपल्यासोबत नेलं. जेवणासाठी कधी ढाब्यावर थांबले, तर कधी स्वत:च जेवण करत त्यांनी या प्रवासात भूकही भागवली.
माध्यमांशी संवाद साधताना दिलेल्या माहितीनुसार त्यांनी 5 किलो गॅस, स्टोव्ह बर्नर आणि काही गरजेच्या वस्तू सोबत नेल्या. 28 ऑक्टोबर 2020 पासून सुरु झालेला त्यांचा प्रवास आजही सुरुच आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, बंगळुरू अशा ठिकाणहून जात त्यांनी महत्त्वाची शहरं ओलांडली. आतापर्यंत त्यांनी 15000 किमीचा प्रवास करत अनेक संस्कृतींचा आस्वाद घेतला. प्रत्येक क्षण ते मनमुरादपणे जगले आणि TinPin Stories या नावाने त्यांनी त्यांचा प्रवास सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांच्याच भेटीला आणला.