अल्पवयीन मुलगी झाली गर्भवती; युट्यूबच्या मदतीनं बाळाला जन्म

अल्पवयीन मुलीचा धक्कादायक प्रकार, 9 महिन्यांच गर्भारपण ठेवलं लपवून 

Updated: Oct 28, 2021, 01:02 PM IST
अल्पवयीन मुलगी झाली गर्भवती; युट्यूबच्या मदतीनं बाळाला जन्म title=

मुंबई : केरळच्या मलाप्पुरममध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने चक्क यूट्यूब व्हिडीओ पाहून बाळाला जन्म दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अल्पवयीन मुलीच्या पालकांना याबाबत माहिती देखील नव्हती. 

पोलिसांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रियकराविरूद्ध पॉक्सो ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलगी आणि तिच्या बाळाला राजकीय मेडिकल कॉलेज आणि रूग्णालयात दाखल केलं आहे. दोघांची प्रकृती उत्तम आहे. 

20 ऑक्टोबर रोजी अल्पवयीन मुलीने घरीच यूट्यूबवर व्हिडीओपाहून बाळाला जन्म दिला आणि गर्भनाळ काढून टाकली. धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलीच्या पालकांना 22 ऑक्टोबर म्हणजे 2 दिवसांनी याबाबतची माहिती मिळाली. अल्पवयीन मुलीचे पालक हे अंध आहेत. त्यामुळे दोन दिवसांनी जेव्हा नवजात बालकाचा आवाज कानी पडला तेव्हा त्यांना याबाबतची माहिती मिळाली. 

अल्पवयीन मुलगी ही 12 वीमध्ये शिकत असून तिचे पालक दृष्टीहीन आहेत. त्यामुळे त्यांना आपली मुलगी गरोदर असल्याची कल्पना देखील नव्हती. अल्पवयीन मुलगी आणि 21 वर्षीय तरूणाचे प्रेम संबंध होते. मुलीला 18 वर्षे पूर्ण झाल्यावर तिचा विवाह करून देण्याचा पालकांचा मानस होता. 

या दोघांनी मात्र प्रेग्नन्सी गुप्त ठेवली होती. पोलिसांनी पुढे सांगितले की, मुलीने ऑनलाइन क्लासेस असल्याचे सांगून नेहमी तिच्या खोलीत राहून तिची गर्भधारणा लपवून ठेवली होती. सीडब्ल्यूसीने आईला तिच्या मुलीच्या गर्भधारणेबद्दल काही महिने पूर्णपणे अनभिज्ञ असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. ती म्हणाला की आई दृष्टिहीन आहे आणि वडिल सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात आणि ते नेहमी रात्रीच्या ड्युटीवर असतात. 

आईने गृहीत धरले होते की मुलगी ऑनलाइन क्लासेस करते तेव्हा ती स्वतःला खोलीत कोंडून घेते. आणि आरोपीने मुलीच्या घरी या परिस्थितीचा गैरफायदा घेतला, असे पोलिसांनी सांगितले.