अमर काणे, झी 24 तास, नागपूर : देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्यानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलंय. मात्र आता चिंता करायचं कारण नाही. तुमची भूक भागवणाऱ्या कोंबड्या चक्क डिझेलची गरजही भागवू शकतात..आम्ही असं का म्हणतोय, तुम्ही स्वतःच बघा. वाढत्या पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) दरवाढीने सर्वसामांन्यांच्या खिशाला आग लागलीये. या समस्येवर केरळच्या (Keral) पठ्ठ्याने एक नामी शक्कल शोधून काढलीये. त्यानुसार आता कोंबड्यांपासून (Hens) डीझेल बनवता येणार आहे. विशेष म्हणजे यासाठी कोंबड्यांची कत्तल करण्याची गरज नाहीये. (Kerala veterinarian John Abraham makes biodiesel from chicken bio waste)
कत्तलखान्यात उरलेल्या वेस्टमधून डिझेल तयार करता येणार आहे. केरळच्या वायनाडमधले (Wayanad) पशूवैद्य असलेल्या जॉन अब्राहम (John Abraham) यांनी तब्बल 7 वर्षांच्या संशोधनानंतर कोंबड्यांच्या बायोवेस्टमधून डिझेल तयार करण्याचं तंत्र शोधलंय.
जॉन अब्राहम यांनी 2014 मध्ये कलपेट्टा इथल्या पोकोडे व्हेटर्नरी कॉलेजमध्ये त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर प्लांट बसवला. यासाठी त्यांना भारतीय कृषीसंशोधन परिषदेनं 18 लाखांचं अर्थसाहाय्य दिलं. कत्तलखान्यात कोंबड्या कापून मांस वेगळं केल्यानंतर उरलेल्या चरबीपासून ते डिझेल तयार करतायेत. कोच्चीतील भारत पेट्रोलियममधून अब्राहम यांच्या बायोडिझेलला गुणवत्ता प्रमाणपत्र मिळालंय. भारतीय पेटंट कार्यालयानं अब्राहम यांना कोंबड्यांपासून बायोडिझेलचं पेटंट नुकतंच दिलंय. 100 किलो बायोवेस्टमधून 1 लीटर डिझेल मिळत असल्याचा त्यांचा दावा आहे.
विशेष म्हणजे प्रयोग सुरू केल्यानंतर वर्षभरातच अब्राहम यांच्या प्रयोगाला यश येऊ लागलं होतं. त्यामुळे 2015 पासूनच आपल्या गाडीत स्वतः तयार केलेलं डिझेलवर वापरतायत. हे डिझेल सामान्य डिझेलपेक्षा 40 टक्के स्वस्त असून 38 किलोमीटरपर्यंत मायलेज मिळत असल्याचा दावा अब्राहम यांनी केलाय.
डुकरांच्या चरबीपासून डिझेल?
आता ते डुकरांच्या चरबीपासून डिझेल तयार करण्यावर संशोधन करतायत. पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले असताना असे पर्यायी मार्ग शोधणा-या संशोधनांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.