पाटना : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भागलपूर येथील घोटाळ्याची नितीश कुमार यांना संपूर्ण माहिती होती, असा आरोप करत नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना या प्रकरणात तुरूंगात टाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे लालूंनी म्हटले आहे.
भागलपूर येथील स्वयंसेवी संस्था सृजनमध्ये मोठ्या प्रमणावर घोटाळा झाल्याचे पुढे आले आहे. सरकारी पैशांच्या या घोटाळा होताना देण्यात आलेले १४ चेक बाऊन्स झाल्याची माहिती नितीश कुमार यांना होती. पण, तरीसुद्धा नितीश यांनी मुख्यमंत्री म्हणून कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे घोटाळेबाजांसोबत नितीश यांचे साटेलोटे होते, असेही लालूंनी म्हटले आहे.
आपल्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत लालूंनी सृजन घोटाळ्याशी संबंधीत काही कागदपत्रे दाखवली. या कागदपत्रांच्या हवाल्याने लालूंनी आरोप केला की, या घोटाळ्याची संपूर्ण कल्पना नितीश कुमार यांना होती. मात्र, कल्पना असूनही त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. या प्रकरणात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना तुरूंगात टाकल्याशिवय मी स्वस्थ बसणार नाही, असेही लालू यावेळी म्हणाले.