नवी दिल्ली : कोलकातामध्ये भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या प्रचार सभेदरम्यान भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल येथील प्रचार सभांचा कालावधी एक दिवसाने कमी करण्यात आला. गुरुवारी रात्री पासूनच पश्चिम बंगालमध्ये प्रचार सभांवर बंदी घालण्यात आली. या निर्णयामुळे निवडणूक आयोगावर टीका होत असली तरी आयोगातील महत्त्वाच्या सुत्रांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.
निवडणूक प्रचार एक दिवस आधी थांबवणे याचा अर्थ राजकीय पक्षांना अचानक मत मागण्यापासून थांबवणे असा नव्हता. तर 19 मे मतदान होईपर्यंत कोणताही हिंसाचार होऊ नये असेच आम्हाला वाटत होते असे निवडणूक आयोगातील सुत्रांनी म्हटले आहे.
पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी रात्री प्रचाराच्या तोफा थंडावल्या. पुर्व निर्धारित कार्यक्रमानुसार शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहणे अपेक्षित होते. यावर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने आपली प्रतिक्रीया दिली आहे. आमच्याकडे एक सूची आहे. आज वेगवेगळे राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या 15 हून अधिक राजकीय सभा आणि रोड शो नियोजित आहेत. त्यांना आपण अचानक थांबवू शकत नाही. आपली ताकद दाखवण्याचा आमचा यामगचा उद्देश नव्हता. प्रचार थांबवण्याचा देखील विचार नव्हता. परिस्थिती संभाळण्याची निवडणूक आयोगाची स्वत:ची पद्धत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.