ममतांच्या नाकावर टिच्चून भाजपाचं 'पोरिबर्तन', 'कालीघाटा'वर आज विचारमंथन

मोदी-शाहांचा हा विजय म्हणजे पश्चिम बंगालमधील चौथ्या राजकीय स्थित्यंतराची नांदी मानली जातेय

Updated: May 25, 2019, 11:39 AM IST
ममतांच्या नाकावर टिच्चून भाजपाचं 'पोरिबर्तन', 'कालीघाटा'वर आज विचारमंथन title=

रामराजे शिंदे, झी २४ तास, नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये भाजपाने एका जागेवरून थेट १८ जागांवर मुसंडी मारलीय. निकालांच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी तृणमूलच्या नेत्यांची बैठक आज कालीघाट इथे बोलावली आहे. आज दुपारी ही बैठक होणार आहे. यात तृणमूलच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल. पार्टीच्या सर्वच महत्त्वाच्या नेत्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश आहेत. पराभूत झालेल्या उमेदवारांनाही उपस्थित राहण्याचे आदेश आहेत. ध्रुवीकरण आणि डाव्यांची मतं भाजपाकडे वळल्याची कारणं असल्याचं तृणमूलच्या नेत्यांना वाटतंय.

पश्चिम बंगालमध्ये भाजपला १८ जागांवर मुसंडी

भाजपाला मिळालेल्या अभूतपूर्व, ऐतिहासिक, अतिभव्य विजयात पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या विजयाचं वेगळं महत्त्व आहे. ममता बॅनर्जी आणि डाव्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपानं १८ जागा जिंकल्या. मोदी-शाहांचा हा विजय स्वातंत्र्योत्तर काळातील बंगालमधील चौथ्या राजकीय स्थित्यंतराची नांदी ठरणार आहे.

'राम' विरुद्ध 'काली'

ममता बॅनर्जींची सत्ता असलेल्या पश्चिम बंगालमध्ये भाजपानं दणदणीत विजय मिळवला. अगदी ममतादिदींच्या नाकावर टिच्चून... निवडणुकीआधी इथं ममता विरुद्ध मोदी-शाह असा निकराचा संघर्ष झाला. या राजकीय संघर्षाला रक्तरंजित गालबोट लागलं. जाळपोळ, हिंसाचाराचा एवढा कहर झाला की, निवडणूक आयोगाला एक दिवस आधीच प्रचारबंदी करावी लागली. मात्र लोकसभा निवडणूक निकालात ममता आणि डाव्यांची पुरती धूळधाण झाली. ज्या सिंगूर प्रकल्पाला विरोध करताना ममता बॅनर्जींनी 'माँ, माटी, मानुष'चा नारा दिला, त्या हुगळी मतदारसंघातही भाजपानं तृणमूलचा धुव्वा उडवला. 'राम' विरुद्ध 'काली' हा संघर्ष अखेर 'रामा'नं जिंकला.

मोदी-शाहांचा हा विजय म्हणजे पश्चिम बंगालमधील चौथ्या राजकीय स्थित्यंतराची नांदी मानली जातेय.

- स्वातंत्र्योत्तर काळात साधारण १९७७ पर्यंत बंगालवर काँग्रेसची एकहाती सत्ता होती

- १९७७ नंतर जवळपास ३२ वर्षं डाव्या पक्षांवर बंगाली जनतेचा विश्वास कायम होता

- १० वर्षांपूर्वी डाव्यांचा हा गड ममता बॅनर्जींनी उद्धवस्त केला

- आणि यंदा मोदी लाटेवर स्वार होऊ बंगालच्या जनतेनं पुन्हा एकदा कूस बदललीय.

 

- २०१४ मध्ये ३९ टक्के मतं मिळवत तृणमूलचे ३४ खासदार निवडून आले होते

- २०१९ मध्ये तृणमूलला ४३ टक्के मतं मिळाली, पण तब्बल १२ जागांचं नुकसान झालं

- २०१४ मध्ये भाजपाला केवळ १७ टक्के मतं मिळाली आणि २ खासदार निवडून आले

- २०१९ मध्ये भाजपानं तब्बल ४० टक्के मतांवर आरूढ होत, पहिल्यांदाच १८ खासदार निवडून आणले

२०१७ पासूनच भाजपा आणि तृणमूल दोन्ही पक्षांकडून प्रचारात धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाला. तृणमूलच्या हिंसक प्रचारला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तितकंच हिंसक उत्तर दिलं. डाव्यांच्या पराजयानं रिक्त असलेली विरोधीपक्षाची जागाही भाजपानं कमावलीय. आता पुढचं राजकारण ममतांच्या अस्तित्वाच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्याचा विकास करण्यासाठी काँग्रेस आणि डाव्यांना बंगाली जनतेनं तीन दशकांचा कालावधी दिला. पण ममता बॅनर्जींच्या बाबतीत जनता तेवढा वेळ थांबणार नाही, हेच ताज्या निकालानं अधोरेखित झालंय.