close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

लोकसभा निवडणूक २०१९ : दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज धुराळा

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याकडे उमेदवारांचं लक्ष्य

Updated: Apr 16, 2019, 10:38 AM IST
लोकसभा निवडणूक २०१९ : दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज धुराळा

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराची रणधुमाळी आज संपणार आहे. १३ राज्यांतील ९७ जागांवर गुरुवारी १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १० मतदारसंघांचा समावेश आहे. यात मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर तसंच विदर्भातील बुलढाणा, अकोला आणि अमरावतीचा समावेश आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याकडे उमेदवारांचा कौल असणार आहे. 

उद्धव ठाकरे आज दुपारी अमरावतीत आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारसाठी आणि संध्याकाळी मुंबईत जोगेश्वरीत प्रचारसभा संबोधित करणार आहेत. अकोल्यात संजय धोत्रे यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरींची सभा होत आहे. तर लातूरमध्ये सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होत आहे. आज प्रचाराची खरी रणधुमाळी बीड जिल्ह्यात उसळणार आहे. धनजंय मुंडे खामगाव, केज, आंबेजोगाई आणि कळंब इथे सभा घेतील तर पंकजा मुंडे केज आणि परळीत सभेला संबोधित करणार आहेत. तर नांदेडमध्ये बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांची प्रचारसभा नांदेडमध्ये होत आहे. 

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या आज सकाळी ११ वाजता बुलढाण्यातल्या खामगावमध्ये, दुपारी १ वाजता उस्मानाबादमधल्या कळंबमध्ये तर दुपारी ३ वाजता बीडमधळ्या परळीत जाहीर सभा आयोजित करण्यात आल्यात. 

दरम्यान, या मतदानाआधीच्या विकेन्डला सर्व पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी मराठवाड्यात जाहीर सभा घेतल्या. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अशोक चव्हाणांच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये होते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी औरंगाबादेत सभा घेतली... तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणीत सभा घेतली.

तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी जालन्यातल्या सभेत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. देशात चौकीदार आणि जालन्यात थकबाकीदार असं म्हणत त्यांनी नाव न घेता भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना टोला लगावला.

हिंगोलीत रोकड जप्त

दुसरीकडे, हिंगोली जिल्ह्यात एक कोटी रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आलीये. कळमनुरी तालुक्यातील हिवरा पाटी इथं तपासणी पथकानं एका वाहनातून ही रक्कम हस्तगत केली. हे वाहन नांदेडहून हिंगोलीच्या दिशेनं जात होतं. हिंगोली येथील साहूजी बँकेची ही रक्कम असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. मात्र, या रकमेसंदर्भात कोणत्याही प्रकारची परवानगी अथवा कागदपत्र आढळून आले नाहीत त्यामुळे सदर रक्कम हस्तगत करुन शासकीय कोषागार कळमनुरी इथं जमा करण्यात आलीय.