LokSabha: भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर वरुण गांधींचा मोठा निर्णय

भाजपाने वरुण गांधी यांना तिकीट नाकारल्यानंतर काँग्रेसने त्यांना पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिली होती. यादरम्यान वरुण गांधी यांनी मोठा निर्णय घेतला आहे.   

शिवराज यादव | Updated: Mar 27, 2024, 12:51 PM IST
LokSabha: भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर वरुण गांधींचा मोठा निर्णय title=

LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर वरुण गांधी आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. याचं कारण भाजपाने तिकीट नाकारल्याने काँग्रेसने त्यांना आपल्या पक्षात येण्याची खुली ऑफर दिली होती. त्यामुळे वरुण गांधी काँग्रेसशी हातमिळवणी करणार का? याची सर्वांना उत्सुकता होती. पण वरुण गांधी यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का देत लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. वरुण गांधींच्या टीमने यासंदर्भात माहिती दिली आहे. वरुण गांधी आपली आई मनेका गांधी यांच्या प्रचारावर संपूर्ण लक्ष केंद्रीत करणार आहेत. मनेका गांधी सुल्तानपूरमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

भाजपाने वरुण गांधी यांना यावेळी पिलीभूतमधून लोकसभेची उमेदवारी देण्यास नकार दिला. त्यांच्या जागी जितीन प्रसाद यांना भाजपाने संधी दिली आहे. दरम्यान मनेका गांधी यांना मात्र सुल्तानपूर येथून तिकीट देण्यात आलं आहे. यानंतर वरुण गांधी पिलीभूत येथून अपक्ष निवडणूक लढतील अशी शक्यता व्यक्त केली होती. पण त्यांच्या टीमने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

वरुण गांधी यांना तिकीट नाकारण्यात आल्यानंतर उत्तर प्रदेशचे भाजपा प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र सिंग यांनी, पक्षाने त्यांना निवडणूक लढण्याची संधी दिलेली नसली तरी ते आमच्यासोबत आहेत असा विश्वास व्यक्त केला होता. पक्ष नेतृत्वाने त्यांच्यासाठी काहीतरी चांगला विचार केला असेल असंही ते म्हणाले होते. काँग्रेसने त्यांना ऑफर दिल्यासंबंधी ते म्हणाले होते की, "वरुण गांधी भाजपाचे खरे शिपाई आहेत. ते भाजपातच राहतील याचा विश्वास आहे. ते गांधी कुटुंबातील असून, भाजपानेच तीन वेळा खासदार बनवलं आहे". काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी गांधी कुटुंबातील असल्याने भाजपाने त्यांना तिकीट दिलं नसल्याचा आरोप केला होता. 

काँग्रसेने दिली होती ऑफर

अधीर रंजन चौधरी म्हणाले होते की, "वरुण गांधींनी काँग्रेसमध्ये सहभागी झालं पाहिजे. ते काँग्रेसमध्ये आल्यास आम्हाला आनंद होईल. वरुण एक चांगले नेते आहेत. ते गांधी कुटुंबाशी संबंधित असल्याने भाजपाने त्यांना तिकीट दिलं नाही. त्यांनी आता काँग्रेसमध्ये यावं अशी आमची इच्छा आहे".

गेल्या काही वर्षांपासून वरुण गांधी सतत सरकारविरोधात विधानं करत आहेत. केंद्र तसंच राज्य सरकारवरही त्यांनी ताशेरे ओढले होते. पक्षाविरोधात भूमिका घेत असल्यानेच भाजपाने त्यांना कोणतीही मोठी जबाबदारी दिली नाही असं बोललं जातं.