Explainer : नितीश कुमार, चंद्रबाबू सोडून गेले तरीही पंतप्रधान कसे होऊ शकतात मोदी? असे आहे समीकरण

Loksabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर इथं महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना देश स्तरावर सर्व लक्ष नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी वेधलं आहे.     

सायली पाटील | Updated: Jun 5, 2024, 04:49 PM IST
Explainer : नितीश कुमार, चंद्रबाबू सोडून गेले तरीही पंतप्रधान कसे होऊ शकतात मोदी? असे आहे समीकरण title=
Loksabha Election result 2024 nda government formation possible even if naidu nitish kumar leaves bjp alliance

Loksabha Election Result 2024 : लोकसभेचा निकाल जाहीर होताच सत्तासमीकरणं बदलण्यास सुरुवात झाली. युती आणि आघाडीमध्ये कोणचा पाठिंबा कोणाला याविषयीचा कयास लावला जाऊ लागला आणि या संपूर्ण परिस्थितीमध्ये जेडीयू, टीडीपी या पक्षांच्या निमित्तानं नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या नेतेमंडळींनी संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं आहे. 

भाजपप्रणित एनडीएला 292 जागा मिळाल्या असून, तिथं 234 जागा मिळालेल्या इंडिया आघाडीकडूनही सरकार बनवण्याची स्वप्न पाहिली जात आहेत. पण, इथं मात्र एनडीएचं पारडं काठावरील आकड्यांनी का असेना, पण जड दिसत आहे ज्यामुळं मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार असल्याची अधिक शक्यता आहे. 

आकडेमोड समजून घेताना... 

लोकसभेतील एकूण 543 जागांपैकी सत्तास्थापनेसाठी एकूण 272 जागांची आवश्यकता असते. त्यातच एनडीएला एकूण 292 जागांवर विजय मिळवता आला आहे. इथं पहिल्या शक्यतेनुार जर नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष एनडीएतून बाहेर पडला, तर त्यांच्या 12 जागा वगळल्यास एनडीएकडे उरतात 280 जागा. इथं बहुमताच्या आकड्यापेक्षा 8 जागा जास्त असल्यामुळं मोदी पंतप्रधानपदी सहज पोहोचू शकतात. 

चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टी अर्थात टीडीपीनं एनडीएची साथ सोडली, तर टीडीपीच्या 16 जागा वगळून एनडीएकडे उरतात 276 जागा. म्हणजेच बहुमतापेक्षा 4 जागा जास्त. त्यामुळं एनडीएला सत्तास्थापना करणं शक्य आहे. 

TDP आणि JDU या दोघांनीही एनडीएची साथ सोडली तर? 

जेडीयूचे 12 आणि टीडीपीचे 16 उमेदवार एनडीएतून बाहेर पडल्यास एनडीच्या एकूण जागांचा आकडा पोहोचतो 264 वर. इथं मात्र एनडीए सत्तास्थापनेपासून 28 जागांनी मागे असेल. 

प्री पोल अलायन्स अर्थात निवडणुकीआधीच्या युतीच्या बळावर बहुमत मिळाल्यास राष्ट्रपतींकडून एनडीएला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केलं जाईल आणि एनडीएचे नेता असल्या कारणानं मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. तिसऱ्या शक्यतेनुसार एनडीएकडे बहुमत नसलं तरीही सर्वात मोठी युती असल्या कारणानं राष्ट्रपती त्यांनाच सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करेल आणि मोदी  पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होतील. हो, पण इथं मात्र त्यांना बहुमत सिद्ध करण्यावाचून दुसरा पर्याय नाही. 

इतर पक्षांची काय भूमिका? 

यंदाच्या निवडणुकीत अपक्ष आणि इतर अनेक लहान पक्ष एनडीएत सहभागी नसून अशा साधारण 18 जागा असून, त्यांना सोबत घेत एनडीएकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाऊ शकतो. 

इंडिया आघाडीला टीडीपी आणि जेडीयूची साथ मिळाल्यास? 

नितीश कुमार यांच्या जेडीयूच्या 12 आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीच्या 16 जागा मिळून 28 जागा इंडिया आघाडीत जोडल्या गेल्या तरीही आघाडी बहुमतापासून अनुक्रमे 28 (जेडीयू सोबत आल्यास) आणि 22 (टीडीपी सोबत आल्यास) जागांनी मागे असेल. 

हेसुद्धा वाचा : उपमुख्यमंत्रीपद सोडण्याचा परस्पर निर्णय? फडणवीस निघून गेल्यानंतर बावनकुळेंचा खुलासा

 

एकएक पक्षाऐवजी जर एकाच वेळी जेडीयू आणि टीडीपीनं इंडिया आघाडीची साथ द्यायची ठरवल्यास 234 + 28 = 262 असं काहीसं समीकरण तयार होईल. तरीही इंडिया आघाडी बहुमतापासून 10 जागा मागेच असेल. अशाच पद्धतीनं यामध्ये लोजपाच्या 5 जागा जोडल्या तरीही इंडिया आघाडीचा आकडा फारफार तर 267 वर पोहोचू शकतो. ज्यामुळं बहुमताचं ध्येय्य इथंही साध्य होणार नाही. 

निवडणूक आणि त्यानंतरच्या निकालानंतरच्या बहुतांश शक्यता आणि सत्तासमीकरणं पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी येणार असल्याचीच अधिक चिन्हं दिसत आहेत. दरम्यान, इथं 18 जागांवर असणाऱ्या अपक्ष आणि लहान पक्षांसह एनडीएची साथ सोडून जेडीयू आणि टीडीपीनं इंडिया आघाडीची साथ द्यायचं ठरवलं तर मात्र इंडिया आघाडी बहुमताचा आखडा गाठून सत्तास्थापनेचा दावा करु शकते. त्यामुळं आता सत्तास्थापनेत नेमकी किती आणि कशी समीकरणं तयार होतात याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.