उपमुख्यमंत्रीपद सोडण्याचा परस्पर निर्णय? फडणवीस निघून गेल्यानंतर बावनकुळेंचा खुलासा

Fadnavis Likely To Exit From Cabinet Bawankule Shelar React: देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा ही घोषणा केली जेव्हा बावनकुळे आणि आशिष शेलार त्यांच्या बाजूलाच बसले होते. मात्र फडणवीस निघून गेल्यानंतर त्यांनी पुन्हा पत्रकारांशी संवाद साधला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 5, 2024, 04:22 PM IST
उपमुख्यमंत्रीपद सोडण्याचा परस्पर निर्णय? फडणवीस निघून गेल्यानंतर बावनकुळेंचा खुलासा title=
पत्रकारांना पुन्हा बोलवून भाजपा नेत्यांनी दिली माहिती

Fadnavis Likely To Exit From Cabinet Bawankule Shelar React: भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीमधील निराशाजनक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. मुंबईमधील पत्रकार परिषेदमध्ये फडणवीस यांनी केंद्रातील वरिष्ठ नेत्यांबरोबर आपण या जबाबदारीतून मुक्त होण्यासंदर्भात चर्चा करणार आहोत, असं सांगितलं. मात्र फडणवीसांनी हे संकेत दिल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये भाजपाच्या निवडणूक व्यवस्थापन समिती बैठकीच्या कोअर ग्रुपमधील सदस्य असलेले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच आमदार आशिष शेलार यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली. फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्यासंदर्भात दिलेले संकेतांबद्दल आम्हाला काहीच कल्पना नव्हती असं बावनकुळेंनी म्हटलं आहे. म्हणजेच फडणवीसांनी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्रीपद सोडण्यासंदर्भात केलेलं विधान हे आधी कोणतीही चर्चा न करता थेट केलं.

फडणवीस काय म्हणाले?

"लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला जागा कमी आल्यात हा फॅक्ट आहे. या निवडणुकीचं नेतृत्व भाजपामध्ये मी करत आहे. जो पराभव झाला, ज्या जागा कमी झाल्या त्याची जबाबदारी माझी आहे. मी हे मान्य करतो की मी कुठेतरी यामध्ये स्वत: कमी पडलो आहे. मी ती कमतरता भरुन काढण्याचा प्रयत्न करणार. भाजपाला महाराष्ट्रात जो काही सेटबॅक सहन करावा लागला त्याची सगळी जबाबदारी मी स्वीकारत आहे," असं फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले. "मी भाजपाकडे अजून एक विनंती करणार आहे. भाजपामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो. मला विधानसभेसाठी पूर्णवेळ उतरायचं आहे. मी आघाडीच्या नेतृत्वाला विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं. ज्यामुळे मला पक्षासाठी काम करता येईल. ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मला माझा पूर्ण वेळ देता येईल," असं फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले. "अर्थात मी सरकारच्या बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये आम्हाला जे काही करायचं आहे ते आम्ही करणार आहोतच. त्या टीमसोबत मी असेन. यासंदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे. त्यानंतर त्यांच्या सल्ल्याने ते जे सांगितील त्यानुसार मी पुढची कारवाई करेन," असंही फडणवीस म्हणाले.

बावनकुळे आणि शेलारांना कल्पनाच नाही

पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस असं काही बोलतील याची कल्पना त्यांच्या बाजूला बसलेल्या बावनकुळे आणि शेलारांनाच नसल्याचं नंतर स्पष्ट झालं. देवेेंद्र फडणवीस पत्रकार परिषद संपवून निघून गेल्यानंतर पुन्हा काहीवेळाने पत्रकारांना पत्रकार परिषदेसाठी बावनकुळे आणि शेलार यांनी बोलावलं. त्यानंतर बावनकुळेंनी नेमकं बैठकीत काय घडलं हे सांगितलं. "महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी, संघटनेसाठी पूर्णवेळ देईन आणि त्यासाठी मी केंद्राची परवानगी घेईल असं विधान या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. देवेंद्र यांची भूमिका संघटनेसाठी महत्त्वाची आहे. मात्र निवडणुकीच्या कोअर समितीच्या बैठकीमध्ये यासंदर्भातील कुठलीही चर्चा त्यांनी केली नाही," असं बावनकुळेंनी पत्रकारांना सांगितलं.

नक्की वाचा >> NDA च्या मित्राचाच नितीन गडकरींच्या मंत्रालयावर डोळा! उपसभापतीपद सुद्धा मागितलं

देवेंद्र पाठीशी उभे राहत नाहीत तोपर्यंत...

"पूर्णवेळ सरकारच्या बाहेर येऊन संघटनेमध्ये काम करण्याची त्यांची इच्छा आहे. पण त्यांनी तशी भावना व्यक्त केली आहे. मात्र आम्ही कोअर ग्रुपचे सदस्य या ठिकाणी असून सर्वांच्या वतीने हे सांगू इच्छितो की, सरकारच्या बाहेर येऊन त्यांनी काम करण्याची गरज नाही या मानसिकतेचे आम्ही आहोत," असं म्हणत बावनकुळेंनी फडणवीसांनी अचानक भूमिका घेतल्याचं सांगितलं. "सरकारमध्ये काम करुनही संघटनेला ताकद देता येते. आमची संघटना पुन्हा ताकदीने उभी राहू शकते अशी आमची मानसिकता आहे. आम्ही नंतरही त्यांना विनंती केली, संघटनेमध्ये आणि सरकारमध्ये समन्वय ठेऊन अजून खूप काम करायची गरज आहे. सरकारमध्ये राहून त्यांनी आम्हाला प्रोटेक्शन द्यावं आणि संघटनेला पुढे न्यावं अशी आमची गरज आहे. देवेंद्र आमच्या पाठीशी उभे राहत नाहीत तोपर्यंत आम्ही जोमाने काम करु शकणार नाही. काल आम्ही मागे राहिलो त्यामुळे त्यांच्या मनात आलेलं एक दु:खामधून त्यांनी व्यक्त केलेली भावना होती," असं बावनकुळे म्हणाले.

नक्की वाचा >> 'मला विश्वास आहे की आपण भविष्यात एकत्र..', मोदींच्या विजयावर 'सेल्फी फ्रेंड' मेलोनींची पोस्ट

सरकारबाहेर पडायची गरज नाही

"शेवटी हे मी जे बोलतोय ते केंद्राशी बोलेन नंतरच माझ्या पुढच्या निर्णयाचा विचार करेन, असं म्हणाले. संपूर्ण राज्याला सांगतो की देवेंद्रजींनी सरकारबाहेर जाऊन संघटनेला मदत करायीच गरज नाही. त्यांनी सरकारमध्ये राहूनच संघटनेला मदत करावी. यासाठी आम्ही सर्वांनी त्यांच्याशी पुन्हा चर्चा केली आहे. त्या चर्चेअंती यावर विचार करतील असा आमचा विश्वास आहे. निकाल कमी आल्याने आम्हाला सर्वांना दु:ख आहे. जबाबदारी आमच्या सर्वांची आहे. त्यांच्याबरोबर राज्याला विकास आणि संघटनेच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न करु," असं बावनकुळे म्हणाले.

नक्की वाचा >> 'मोदी स्वतःला हिंदूंचे नवे शंकराचार्य..', ठाकरे गटाची सडकून टीका; म्हणाले, '400 पारचा नारा..'

तेव्हाचा निर्णयही परस्परच

राज्यातील सत्तानाट्यानंतर एकनाथ शिंदेंकडे मुख्यमंत्रीपद सोपवण्यात आलं त्यावेळेसही देवेंद्र फडणवीस यांनी सरकारबाहेर राहण्याचा निर्णय पत्रकारांसमोर जाहीर केला होता. हा निर्णयही त्यांनी परस्पर घेतला होता. मात्र नंतर दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी फोनवरुन सरकारमध्ये सहभागी होण्याचा आदेश दिल्यानंतर फडणवीसांनी राजभवनामधील दरबार सभागृहामध्ये एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीच्या सोहळ्यात फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.