close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

लोकसभा निवडणूक २०१९: महत्त्वाच्या #५ बातम्या

महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Updated: Mar 15, 2019, 05:44 PM IST
 लोकसभा निवडणूक २०१९: महत्त्वाच्या #५ बातम्या

# राष्ट्रवादीची दुसरी यादी :पार्थ पवार, भुजबळ आणि अमोल कोल्हेंना उमेदवारी

राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये पार्थ पवारांना मावळमधून उमेदवारी  देण्यात आली आहे. तर नाशिक मधून समीर भुजबळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.तर शिरूरमधून अमोल कोल्हे यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याआधी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार माढा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगण्यात येत होते. पण आपण निवडणुक लढवणार नसल्याचे पवारांनी जाहीर केले आहे. कालच राष्ट्रवादीने आपली पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये बारामतीतून सुप्रिया सुळे, रायगडमधून सुनील तटकरे, कोल्हापुरातून धनंजय महाडिक, साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांच्यासह अन्य नावे जाहीर करण्यात आली होती. 

# मोदी देशासाठी पंतप्रधान असतील, माझ्यासाठी मात्र नरेंद्रभाई- उद्धव ठाकरे

नरेंद्र मोदी हे देशासाठी पंतप्रधान असतील, मात्र माझ्यासाठी ते नरेंद्रभाई आहेत. तुमच्या भावासारखी असणारी व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी असणे ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींचे कौतुक केले. ते शुक्रवारी अमरावती येथील सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी मुक्तकंठाने नरेंद्र मोदी यांची तारीफ केली. आता अनेकजण भाजप आणि नरेंद्र मोदींविषयी माझे इतके मनपरिवर्तन कसे झाले, असा प्रश्न उपस्थित करतील. मात्र, यापूर्वी आम्ही केलेला विरोध हा व्यक्तिगत कारणास्तव नसून जनतेच्या कामांसाठी होता. युती करतानाच या मुद्द्यांवर सहमती झाली आणि भाजपने ते मार्गीही लावले याचा आम्हाला आनंद आहे, असे उद्धव यांनी सांगितले. 

# 'पूल दुर्घटनेत घटनास्थळीही न येणारे उद्धव ठाकरे अमरावतीत प्रचाराला'

अमरावती येथे शिवसेना-भाजपा युतीने आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. ही युती म्हणजे फेविकॉल का मजबूत जोड... ती तुटणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. भाजपाला यापुर्वी केलेला विरोध हा व्यक्तीगत विरोध होता असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या असंवेदनशिलतेचे दर्शन राज्याला झाले आहे. सीएसटीएम दुर्घटनेनंतर घटनास्थळीही न येणारे उद्धव ठाकरे अमरावतीत प्रचाराला गेल्याने त्यांच्यावर आणि युतीवरही टीका केली जात आहे. युतीच्या या असंवेदनशिलतेचा विरोधी पक्षांनी चांगलाच समाचार घेतला आहे. दुर्घटनाग्रस्त पुलाची जबाबदारी पालिकेची असल्याचे समोर आले आहे. तरी आयुक्त, महापौर यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा अशी मागणीही विरोधक करत आहेत. 

# ही युती म्हणजे 'फेविकॉलचा मजबूत जोड', तो तुटणार नाही- मुख्यमंत्री

'ही युती म्हणजे फेविकॉल का मजबूत जोड, ती तुटणार नाही' असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. युतीच्या प्रचाराला अमरावतीतून सुरूवात झाली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी युतीचे गुणगान गायले आणि युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. लोकसभा निवडणुकीचा हा पहिलाच मेळावा आहे. ही युती केवळ दोन संघटनांची युती नाही. ही विचारांची युती आहे. आम्हाला अभिमान असल्याचे  आम्ही हिंदुत्ववादी संघटना आहोत. ज्याला हिंदुत्वा बद्दल प्रेम आहे त्या सर्वांचे स्वागत आहे. राष्ट्रीय विचारांनी प्रेरीत असलेल्या दोन पक्षांची युती आहे.

# 'पेंग्विन पाळण्यापेक्षा जनतेची काळजी घ्या' नितेश राणेंचा टोला

गुरूवारी 14 मार्च रोजी सायंकाळी 'सीएसएमटी' जवळील  दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सहा जणांना आपला जीव गमवावा लागला तर 31 जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासन आणि इतर नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले. काँग्रेस आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे नेते नितेश राणे यांनी या दुर्घटनेनंतर शिवसेनेवर चांगलीच टीका केली आहे. 'पेंग्विन आणि नाईट लाईफच्या मुद्याकडे अधिक लक्ष देण्यापेक्षा पालिकेत सत्ता असलेली शिवसेना खऱ्या जिवंत माणसांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न का करत नाही? असा सवाल केला आहे. आता पुन्हा एकमेकांवर आरोप करत पूलाच्या ऑडिटसाठी चर्चा सुरू होईल. परंतु यातून काहीच होणार नाही. सर्वात श्रीमंत पालिका असूनही लोकांच्या जीवाची शून्य किंमत असल्याची' टीका नितेश राणे यांनी केली आहे.