श्रीराम फक्त हिंदूंचीच नव्हे तर जगाची देवता, फारुक अब्दुल्ला

रामजन्मभूमीचा मुद्दा न्यायालयात नाही तर टेबलावर समोरासमोर बसून सोडवला पाहिजे.

Updated: Jan 4, 2019, 01:36 PM IST
श्रीराम फक्त हिंदूंचीच नव्हे तर जगाची देवता, फारुक अब्दुल्ला title=

नवी दिल्ली - प्रभू श्रीराम फक्त हिंदूचा देव नाही. तर संपूर्ण जगासाठी ते देवासारखेच आहेत. त्यामुळे रामजन्मभूमीचा मुद्दा न्यायालयात नाही तर टेबलावर समोरासमोर बसून सोडवला पाहिजे, असे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. रामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याच्या खटल्याची सुनावणी १० जानेवारीपासून नव्या खंडपीठापुढे सुरू करण्यात येणार आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीवेळी हा निर्णय घेण्यात आला. यानंतर लगेचच फारुख अब्दुल्ला यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, रामजन्मभूमीप्रकरणी संबंधित सर्व पक्षकारांनी एकत्र बसून हा विषय चर्चेतून सोडवला पाहिजे. हा विषय न्यायालयात नेण्यात काहीच हाशील नाही. चर्चेतून रामजन्मभूमीचा विषय सोडवला जाईल, याची मला खात्री आहे. प्रभू श्री राम हे जगाचे आहेत ते फक्त हिंदूचे नाहीत. कोणीही प्रभू श्रीरामांच्या विरोधात नाही. त्यामुळे केवळ अयोध्येतील मंदिराचा विषय चर्चेतून सोडवायला हवा. 

फारुक अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्स यांच्या पक्षाने गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात अयोध्येतील प्रश्नावर आपले मत मांडले होते. त्यावेळीही फारुक अब्दुल्ला यांनी राम हे जगाचे असल्यामुळे अयोध्येतच त्यांचे मंदिर बांधले जायला हवे, असा आग्रह का धरला जातो आहे, असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी जनता दल युनायटेडचे नेते पवन वर्मा यांनी फारुक अब्दुल्ला यांना उत्तर दिले होते. प्रभू रामाचे मंदिर अयोध्येत का उभारले जाऊ शकत नाही. अयोध्या रामाची जन्मभूमी आहे. त्यामुळे तिथे मंदिर का बांधू नये, असा प्रश्न विचारत पवन वर्मा यांनी फारुक अब्दुल्लांचा मुद्दा खोडून काढला होता. जर हिंदूंना त्या ठिकाणी मंदिर बांधायचे आहे तर ते बांधले गेलेच पाहिजे. मंदिर बांधायचे की नाही, असा प्रश्नच नाही. ते बळाच्या साह्याने की परस्पर सामजस्याने बांधायचे हाच केवळ प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.