Dinosaur Egg Found in MP: श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजून घेणे खूप आवश्यक आहे. अनेकदा अंधश्रद्धेमुळं मानवाचे खूप नुकसान झाल्याची उदाहरणदेखील तुम्ही पाहिली आहेत. मध्य प्रदेशातही एक अजीब प्रकार समोर आला आहे. दगडाचे गोळे म्हणून गावकरी ज्याची पुजा करत होते त्याची तपासणी करताच मात्र वेगळेच सत्य समोर आले आहे. तज्ज्ञांच्या एका पथकाने केलेल्या तपासणीत हे सत्य उघड झाली आहे. मध्य प्रदेशातील धार येथील हा प्रकार आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, पडल्या गावातील वेस्ता मंडलोई (40) त्यांच्या पूर्वजांची परंपरा पाळत आहेत. ते गेल्या कित्येक वर्षांपासून या दगडांची काकर भैरव म्हणून पूजा करत होते. त्यांचा विश्वास होता ती ही त्यांची कुलदेवता असून त्याची पूजा केल्याने शेती आणि गुरांची काळजी घेते आणि सर्व संकटापासून बचाव करते. मात्र, तज्ज्ञांनी त्याची तपासणी करताच तो पाषाण नसून ते डायनासॉरचे जीवाश्म असल्याचे तपासात समोर आले आहे.
ककारचा अर्थ आहे जमीन किंवा शेती आणि भैरव म्हणजे देव यावरुनच गावकरी या पाषाणाला ककारभैरव असं म्हणतात. मंडलोईप्रमाणेच परिसरातील अनेक लोकांनी धार आणि आसपासच्या इतर जिल्ह्यात खोदकामादरम्यान सापडलेल्या या पाषाणाची पूजा करतात. मात्र, गावकऱ्यांचा हा समज चुकीचा ठरला आहे.
लखनौच्या बीरबल सहानी इन्स्टीट्यूट ऑफ पॉलियोसायसेजच्या तज्ज्ञांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी या परिसराचा दौरा केला तेव्हा त्यांना या पाषणाबाबत माहिती मिळाली. ज्या पाषणाची स्थानिक लोक पूजा करतात ते खरं तर डायनासॉरच्या टायटेनोसॉरस प्रजातीचे जीवाश्म अंडे आहेत.
हा पहिला भारतीय डायनासॉर आहे ज्याचे नामकरण योग्य पद्धतीने करण्यात आले होते. ही प्रजाती पहिल्यांदा 1877 मध्ये नोंद करण्यात आली होती. टायटेनोसॉर पृथ्वीवर फिरणाऱ्या सर्वात विशाल डायनासॉरपैकी एक होता. पण ही प्रजाती जवळपास 70 मिलियन वर्षांपूर्वी क्रेटेशियस काळात या क्षेत्रात अस्तित्वात होती.
या वर्षांच्या सुरुवातीला मध्य प्रदेशात टायटॅनिक डायनासॉरचे जवळपास 250पेक्षा अधिक अंडे सापडले आहेत. नर्मदाच्या खोऱ्यात सर्वाधिक अंडी सापडली आहेत. जानेवारीमध्ये, पीएलओएस वन या पीअर-रिव्ह्यू केलेल्या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात दिल्ली विद्यापीठ (DU) आणि भोपाळमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) च्या संशोधकांच्या टीमने केलेल्या विस्तृत क्षेत्रीय संशोधन केले. त्यांनी 256 जीवाश्मयुक्त टायटॅनोसॉर अंडी असलेल्या डायनासॉरच्या 92 घरट्यांचा शोध लावला आहे.